मनाची मशागत ( भाग १ )

प्रा. शैलेश कुलकर्णी

व्यक्ती तितक्‍या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता ही देखील भिन्न असते. या भिन्नविभिन्न मानसिकतेचा विचार करून कुटुंबामध्ये एकता निर्माण करावी लागत असते. आपल्या व्यक्त होण्याचा संबंध आपल्या मनाशी असतो. एका व्यक्तीच्या अंतरंगाचा संबंध त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतोच असं नाही. त्यांचं परस्परांमध्ये एक निराळं नातं जरूर असतं. आपलं स्वतःचं, हक्काचं, आपलं कुटुंब की जे नेहेमीच आपलं वाटत असतं, केवळ आपल्या अंतर्मनातील भावभावनांमुळे. त्यामुळे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कुटुंबाचा विचार करणं आवश्‍यक ठरतं.

प्रत्येक कौटुंबिक सदस्याच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे आवडीनिवडी, अपेक्षा, गरजा, शारीरिक व्यक्तिमत्त्व हे निराळं असतं. त्याला साजेसं, शोभेल असं घरातील वातावरण असणं उपयोगाचं ठरतं. घराच्या वातावरणाचा संबंध घरातील व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतो. घराच्या सौंदर्य निर्मितीसाठी मनाच्या सुंदरतेचा विचार करावा लागतो. मनाला आनंदी ठेवण्याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं असतं.

दैनंदिन जीवनात आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो, ह्याचा अंदाज काही वेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद- प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचितीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो. आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारावर तो निर्माण कसा, किती आणि कधी होतो ? ते अवलंबून असतं. अनेकदा आपल्या अंतर्मनातील विचारांमध्ये आपण गुरफटले जात असतो, अगदी नकळत होत असतं तसं. दिवसभरांत हजारो प्रकारचे निरनिराळे विचार आपल्या अंतर्मनांत निर्माण होत असल्याचं विज्ञानाच्या प्रयोगांतून स्पष्ट झालं आहे. त्या विचारांना विशिष्ट दिशा, गती अथवा विषय असतीलच असं नाही. दिवसभरात आपल्या मनांत आलेले सर्वच विचार, तसं बघितलं तर, आपल्या लक्षात देखील राहतातच असं नाही. असं म्हटलं जातं की आपल्या प्रत्येकाची दोन मनं कार्यरत असतात. एक अंतर्मन, जे सुप्त स्वरूपात कार्यरत असतं आणि दुसरं बाह्यमन, ज्याचं कार्य जाणीवपूर्वक सुरू असतं.

थोडं अंतरंगात डोकावून बघावं

आपल्यासाठी आपलं सुप्तावस्थेत असणारं अंतर्मन अधिक महत्त्वाचं असतं. आपले विचार, वर्तन आणि व्यवहारांचा थेट परिणाम आपल्या अंतर्मनावर होत असतो. विचार, वर्तन आणि व्यवहार सकारात्मक पातळीवर अंतर्मनावर कोरले गेले, तर यशप्राप्ती सहज साध्य आणि शक्‍य होत असते. ह्या उलट नकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहार या सर्वांमुळे अंतर्मनाला दु:ख आणि एकूणच आपल्या वाट्याला अपयश येतं. आपल्या दृष्टिकोनावर आपले अनुभव संचित होत असतात. अनुभव सुखदु:खाचे म्हणजेच संमिश्र स्वरूपाचे असतात. अनेकदा दु:ख अधिक आणि सुख मात्र अगदी थोडं आपल्या वाट्याला आलं असल्याचं म्हंटलं जातं. खरं तर, जसा चष्मा लावावा तसंच दिसतं.

प्रत्येक विषयाकडे आपण कसं पाहतो, त्या अनुषंगानं आपलं वैचारिक मंथन सुरू राहात असतं. सर्वप्रथम बाह्यमन त्याचा विचार करायला लागतं आणि त्याच वेळी आपल्या सुप्त अंतर्मनावर प्रत्येक विषय प्रतिबिंबित होत राहतो. मग क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ सुरू होतो. अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेला प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतो. अनेकदा मनात येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडित असतात, तर ते काही वेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं? याबद्दलचे असतात. आयुष्याच्या अवघड शाळेत आपण कोणत्या वर्गात आहोत, परीक्षा कोणती आहे हे ठाऊक असतंच असं नाही; कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्‍नपत्रिका वेगळी असते.

मनाची मशागत ( भाग २ )

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.