– हेमंत महाजन
अमेरिकन वर्तमानपत्र ‘इकॉनॉमिस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये सध्या तरुणांनी सैन्यातील भरतीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे चीन नेपाळी आणि तिबेटीयन गुरखा भरतीवर जोर देत आहे.
चीन सध्या आपल्या सैन्यात तरुणांच्या कमतरतेचा सामना करत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांची सैन्यात जाण्याची इच्छा कमी होणे. आधुनिक जीवनशैली, उच्च शिक्षण आणि चांगल्या नोकर्यांच्या शोधात युवक सैन्यदलाकडे आकर्षित होत नाहीत.
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे तरुण पिढी सैन्य सेवांपेक्षा इतर व्यवसायांकडे आकर्षित होत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे तरुणांमध्ये सैन्य सेवा करण्याची इच्छा कमी होत आहे. यामुळे चिनी सैन्याला युवकांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
जागतिक महाशक्ती बनण्याकरता राष्ट्रपती जिनपिंग त्यांच्या सैन्याला 2035 पर्यंत सर्वात आधुनिक सैन्य बनवणार आहेत. परंतु अमेरिकन वर्तमानपत्र ‘इकॉनॉमिस्ट’नुसार चीनमध्ये सध्या सैन्यामध्ये तरुण भरती होत नाही.
जिनपिंग यांच्या आवाहनाला दाद न देता युवक सैन्यामध्ये भरती होण्याकरता तयार नाहीत. चीन एक म्हातारा देश होत चालला आहे. 1979 पासून 2015 पर्यंत चीनने ‘वन चाइल्ड पॉलिसी’ अमलामध्ये आणली होती. त्याचे परिणाम आता चीनच्या सरकारी आकड्याप्रमाणे 16 ते 24 या वयोगटांमध्ये, जे सैन्यभरतीचे वय असते, तिथे संख्या अत्यंत कमी झालेली आहे.
सैन्यात नोकरी करण्यापेक्षा तंत्रज्ञान जगतात किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणे तरुण मुले आणि मुलींना अत्यंत आवडते. सैन्यदलाला कॉर्पोरेट जगताप्रमाणे भरपूर पगार दिला जाऊ शकत नाही. याशिवाय चिनी सैन्यामध्ये पेन्शन नाही. शिवाय युवकांना अत्यंत थंड भागामध्ये किंवा भारत-चीन सीमेवरती तैनात होऊन खडतर जीवन जगण्यामध्ये फारसा रस नाही.
चिनी नेतृत्व त्यांच्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न करते की चीन ही एक अत्यंत महत्त्वाची सिव्हिलायझेशन आहे आणि ते येणार्या काळामध्ये जगावरती राज्य करणार आहेत. पहिले चिनी नागरिक, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्ये जायला तयार असायचे, कारण त्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये प्रगती करण्यामध्ये मदत मिळायची. शिवाय त्यांना इतरांप्रमाणे चिनी सरकारकडून त्रास दिला जात नव्हता.
परंतु आता चीनचे आर्थिक जगत वेगाने वाढत असल्यामुळे पैसे कमवण्याच्या आणि आयुष्यात वर जाण्याच्या अनेक इतर संधी चीनमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बनून आयुष्यात प्रगती करायची कल्पना बहुतेकांना आवडत नाही. याआधी चिनी सैन्यामध्ये भरती होणारे युवक हे लहान गाव, खेड्यांतून यायचे. परंतु आता तिथे भरपूर नोकर्यांची निर्मिती झाल्यामुळे खेडे आणि छोट्या गावातले युवक सैन्यात यायला तयार नाहीत.
चिनी सैन्यामध्ये सैनिकांची कमतरता जाणवत असल्यामुळे त्यांची शस्त्र सिद्धता, संरक्षण सिद्धता आणि सैन्याचे आधुनिकीकरण मागे पडत आहे. ‘सायबर वॉरफेयर’सारख्या क्षेत्रातसुद्धा काम करण्याकरता त्यांना पुरेसे युवक मिळत नाहीत. यामुळे अत्याधुनिक शस्त्रे तयार आहेत, पण ती चालवण्याकरता मिळणारे सैनिक चीनला मिळत नाहीत.
सैनिकांची कमी एवढी आहे की चीन आता नेपाळी गुरखा आणि तिबेटीयन अल्पसंख्याकांनासुद्धा सैन्यात भरती होण्याकरता प्रयत्न करत आहे. मात्र नेपाळी युवकांचे शिक्षण कमी असल्यामुळे आणि त्यांना चिनी भाषा अजिबात येत नसल्यामुळे ते फारसे चांगले सैनिक बनू शकत नाहीत.
तिबेटीयन युवक हे स्वाभाविकरित्या अत्यंत मवाळ असतात. त्यांना चिनी सैन्यामध्ये भरती होण्यामध्ये अजिबात रस नाही. मात्र, सध्या चीन अनेकांना सैन्यामध्ये येण्याकरता भाग पाडत आहे. परंतु अशा प्रकारे भरती केलेले सैन्य चीनला किती मजबूत बनवू शकतील हा एक संशोधनाचा विषय आहे. हिमालयीन प्रदेशात चीन आणि भारत यांच्यादरम्यान सीमावाद आहे. गुरखा सैनिकांच्या मदतीने चीन या प्रदेशाचे अधिक प्रभावीपणे संरक्षण करू शकतो.
गुरखा सैनिकांना चिनी भाषा आणि संस्कृती शिकण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे त्यांना इतर चिनी सैनिकांसोबत काम करण्यास अडचण येते. नेपाळी गुरखा भरतीमुळे नेपाळ आणि भारत यांच्याशी चीनचे संबंध बिघडू शकतात. चिनी सैन्यातील अनेक जण गुरखा सैनिकांच्या भरतीला विरोध करतात.
तिबेटी लोक हिमालयाच्या प्रदेशात राहतात आणि त्यांच्याकडे कठोर वातावरणात जगण्याची क्षमता असते. यामुळे ते हिमालयाच्या प्रदेशात होणार्या युद्धात फायदेशीर ठरू शकतात. तिबेटी युवक भरती करून चीनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तिबेटी आणि चिनी तरुणामध्ये पार्श्वभूमी, भिन्न संस्कृती आणि भाषा हा मोठा फरक आहे.
यामुळे संवाद आणि समन्वय साधणे कठीण होते. अनेक तिबेटी युवकांचा शिक्षण स्तर कमी असतो. यामुळे त्यांना आधुनिक युद्धात वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे कठीण होते. तिबेटी लोक चीनच्या विरुद्ध असतात. अशा परिस्थितीत तिबेटी युवकांना चिनी सैन्य शिस्त शिकवणे आणि चिनी सैन्यात भरती करून त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड असते.
यामुळे चिनी सैन्य शक्ती कमजोर होऊ शकते. तिबेटी युवक भरतीमुळे तिबेट प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो आणि चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोधाला सामोरे जावे लागू शकते. चीनला या आव्हानांना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन रणनीती आखावी लागेल.
तिबेटी, गुरखा सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी चीनला दीर्घकालीन प्रयत्न करावे लागतील.