मुंबई, -उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून उघड करण्यात आलेले नाही. आता हिरेन यांचा व्हिसेरा रासायनिक पृथक्करणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे.
हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ठाण्यातील खाडीत आढळल्याने एकच सनसनाटी निर्माण झाली. त्यांचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त झाला. त्यामध्ये हिरेन यांच्या शरिरावर कुठल्या इजा आढळलेल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. व्हिसेराच्या रासायनिक पृथक्करणातून मृत्यूच्या नेमक्या कारणाची स्पष्टता होण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय हिरेन यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटूंबीयांनी घेतली होती. त्यामुळे अहवालाची प्रत घेऊन पोलीस पथक हिरेन यांच्या घरी पोहचले. पोलिसांच्या मनधरणीनंतर हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांचे कुटूंबीय राजी झाले. दरम्यान, संबंधित प्रकरणाचा तपास हाती घेणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली.