वडूज पोलिसांची कारवाई; दोघे ताब्यात; संशयितांना पळवण्याचा प्रयत्न
सातारा (प्रतिनिधी) -महसूल प्रशासनाच्या कृपेने माणगंगेच्या पात्रातील वाळू लुटून “बाहुबली’ झालेल्या माण तालुक्यातील वाळू सम्राटाला वडूज पोलिसांनी दणका दिला आहे. पोलिसांनी ओंकार लालासाहेब वीरकर, सनी धनाजी चव्हाण (रा. म्हसवड) यांना वाळू चोरीप्रकरणी अटक केली आहे, तर बाळासाहेव संभाजी पिसे, बापू उर्फ गोरख संभाजी पिसे (रा. म्हसवड) यांच्यावर पोलिसांच्या ताब्यातील संशयितांना पळवून नेणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित बाळासाहेब व बापू हे दोघे पसार झाले असून पोलिसांनी ट्रक व वाळू मिळून आठ लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथून विट्याकडे (जि. सांगली) पडळ फाटामार्गे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वडूजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार देशमुख यांनी पडळ फाट्यावर सापळा लावला होता. आज सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ट्रक (एमएच-45-टी-9664) येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून पाहणी केली असता त्यात वाळू होती. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, परवाना नसल्याचे चालक ओंकार वीरकरने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक वडूज पोलीस ठाण्याकडे नेण्यास चालकाला सांगितले. त्यावेळी पाठीमागून कारमधून (एमएच-11-बीएस-7000) दोघांनी पोलीस गाडीला कार आडवी मारली.
या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. ही कारवाई तुम्हाला जड जाईल. ट्रक कोणाचा आहे, हे माहिती आहे का, अशी धमकी संशयित बाळासाहेब पिसेने दिली. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यातील वाळूचा ट्रक व दोन संशयितांना पळवून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर संशयितांनी पोलिसांना शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.