नगर – गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात लम्पी त्वचारोगचा संसर्ग वाढू लागला असून त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून लसीकरण असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मनुष्यबळाचा अभाव असला तरी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 64 हजार जनावरांचे लसीकरण झाले असून आतापर्यंत 5 लाख 31 एवढे लसीकरण करण्यात आले आहे.
मनुष्यबळाची कमतरता भासत असली तरी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी खासगी व शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा मेळ घालून लम्पी त्वचारोग संसर्गवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या तरी जिल्हा परिषदेच्या पशुसंर्वधन विभागाची 44 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पद रिक्त आहेत. तर पशुधन विकास अधिकाऱ्यांची दोन अशी 46 पदे रिक्त असून ती तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असले तरी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
सध्या 248 शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व 446 खासगी डॉक्टरांमार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरण मोफत करण्यात येत असून राज्यात नगर जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. लसीकरणाला पावसामुळे अडसर येत आहे. पावसामुळे पाणी साठत असून डास व माशांची मोठ्याप्रमाणावर मैदास होत आहे. परिणामी या रोगाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य अधिकारी कमी असले तरी पशुसंवर्धन विभागातील अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत असून अशा 27 कर्मचाऱ्यांवर देखील लसीकरणाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.