पुणे : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन तिला पुण्याला आणण्यात आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली मात्र कोर्टाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढ
मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.मनोरमा खेडकरसोबत तिचे पती दिलीप खेडकर यांच्यावरती देखील गुन्हा दाखल आहे, मात्र ते देखील गायब आहेत त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
एक वर्षापूर्वी मुळशी तालुक्यातील धडवली गावात मनोरमा खेडकर या शेतकऱ्यांना पिस्तूल रोखून मारहाण करण्याचा व्हिडिओ काल सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता.यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत या मारहाण आणि पिस्तूल प्रकरणात पोलिसांनी पूजा खेडकरचे आई-वडील,काका व काही बाऊन्सर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर ( वय ६५ वर्षे, रा.मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन )ता.दौड,जि,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.पंढरीनाथ पासलकर व मारूती मरगळे यांना मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तसेच दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाहेर काढले होते.असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश जाधव,गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक सावंत,पोलिस हवालदार राँकी देवकाते, पोलिस नाईक सिध्देश पाटील,पोलिस हवालदार तुषार भोइटे,रेश्मा साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.