पुणे – मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी वादग्रस्त प्रशिक्षाणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्या जामिनावर सरकारी पक्ष, मूळ फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. उद्या (शुक्रवार दि. २) जामिनावर निर्णय होण्याची शक्यात आहे. सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा, सरकारी पक्षातर्फे ॲड. कुंडलिक चौरे, मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली.
प्रत्यक्ष गोळीबार झालेला नाही. त्यामुळे खूनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. तिच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. त्यामुळे आर्म ॲक्ट लागू होत नाही. तिने स्वरक्षणासाठी पिस्तुल वापरले आहे, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा यांनी केली. व्हिडीओवरून तिने स्वरक्षणासाठी पिस्तुल वापरले असे दिसून येत नाही. व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, व्हिडीओ खरा असल्याचे त्यांच्याकडून कबुल करण्यात येत आहे. न्यायालयीन वाद सुरू असतना जाग्याच्या ताब्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे.
कानपट्टीवर पिस्तुल ठेवून गोळी झाडणार होते. मात्र, लोकांनी ओढले, म्हणून वाचलो. अन्यथा तेथेच मृत्यू झाला असता. घटनेच्या वेळी उपस्थित असलेले तिचे अंगरक्षक अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. मोबाइल जप्त करायचा आहे. वादग्रस्त असलेली तिची मुलगी पुजा खेडकर फरार आहे. तिच्याकडून पुराव्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी मूळ फिर्यादीचे वकील ॲड. अमेय बलकवडे यांनी केली.