लुधियाना – पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शेतकरी संघटनांमध्ये अखेर मनोमिलन झाले. आता त्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत काही शेतकरी संघटनांनी संयुक्त समाज मोर्चा ही आघाडी निवडणुकीसाठी स्थापन केली.
तर, आणखी एक शेतकरी नेते गुरनामसिंग चढुनी यांनी संयुक्त संघर्ष पक्षाची स्थापना केली. त्यांनी निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, जागावाटपावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यावरून कमी जागा देत असल्याबद्दल चढुनी यांनी संयुक्त समाज मोर्चावर टीकास्त्रही सोडले.
आता त्यांच्यात दिलजमाई झाली आहे. चढुनी यांच्या पक्षाला 10 जागा देण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. संयुक्त समाज मोर्चाने याआधीच 10 उमेदवार जाहीर केले. आता त्या मोर्चाने 20 उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकरी संघटनांनी आता पंजाबमधील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.