जालना – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला दोन दिवस झाले असून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचे अल्टिमेटम दिले. मनोज जरांगे यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा. या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्यांना आरक्षण देता येणार नाही.
इतर मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी वडीगोद्रीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आरक्षणाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.