Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. येत्या 17 सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. जालना येथे पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी मनोज जरांगे यांनी 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार, असा इशारा दिला होता.
मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तपण्याची शक्यता आहे. सगेसोयरे अधिसूचना काढून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे. मात्र ओबीसी समाजाने याला विरोध केला आहे. अद्यापही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी ते आंदोलन करत आहेत.
जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
दरम्यान, राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची ताकद दाखवणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती.
यानंतर सोमवारी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सरकारला थेट इशारा दिला आहे. तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर तुमचे 113 आमदार घरी बसले म्हणून समजा. मराठा आता थांबणार नसून तो तुम्हाला लोळवल्याशिवाय सोडणार नसल्याचेही जरांगे म्हणाले. तसेच आता 288 मतदारसंघात घोंगडी बैठक घेणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले.
आता आम्हाला कितीही आडवे आले तरी ही लढाई थांबणार नाही. फडणवीस यांच्या माध्यमातून या आमदारांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे. परंतु फडणवीस साहेब मराठा तुम्हाला आता लोळवल्याशिवाय सोडणार नाही. गोरगरीब मराठ्यांनो आता जागे व्हा. कारण आता ही मार खायची वेळ आली तर केस झाली तर होऊ द्या. पण तुम्ही मागे हटू नका. कारण आता ही आरपारची लढाई आहे, असेही ते म्हणाले होते.
हेही वाचा :
एका दिवसाचे भाडे तब्बल 84 लाख रुपये जगातील सर्वात महागड्या बेटाची चर्चा