Maharashtra Assembly Elections 2024 । Manoj Jarange : राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, यावेळी निवडणुकीत मराठवाड्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.
कारण या निवडणुकीआधी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या रुपात संपूर्ण मराठा मतदार एका छताखाली आणला आहे. अश्यातच, आता मनोज जरांगे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, आज जरांगे यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी त्यांनी निवडणुकीत आपल्या नावाचा वापर करू पाहणाऱ्यांना सज्जड दमच दिला आहे. आपल्या नावाने पैसे गोळा केली जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी असले प्रकार होऊ नये म्हणून दम दिला आहे.
ते म्हणाले, “कोणी जर माझ्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर त्या लोकांचे पैसे वर्गणी काढून परत करण्यात येईल. कुणाचा कपडा घेतला म्हटलं, कुणाची चप्पल घेतली म्हटलं तर चप्पल तोंडावर फेकून मारेल, माझ्या नावाचा वापर करणारे कोण लोकं आहेत, हे मला माहीत आहेअसा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
फडणवीसांना मतदान करायचं नाही :
ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणलं, आपल्या लेकरांच्या डोळ्यातून रक्त काढलं, मराठा समाजाला हीन वागणूक दिली, त्यांना मतदान करायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या आईबापाचं मतदान घेतलं पण आरक्षण दिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
24 तारखेला बैठक होणार :
5-6 दिवसांत कळेल कोणते कोणते मतदारसंघ लढायचे. आम्ही 24 तारखेला इच्छुकांना बोलवलं आहे. जो बैठकीला येणार नाही, त्याने स्वत:ला गृहित धरू नये. तुम्ही बैठकीला येणार नाही आणि फॉर्म भरणार असं कधी होणार नाही. हे मान्यच होणार नाही. त्यामुळे ज्यांना अर्ज भरायचे आहेत, त्यांनी बैठकीला आलंच पाहिजे, असंही ते म्हणाले.
निवडणुकीची त्रिसूत्री :
1. जी जागा जिंकून येऊ शकते अशा ठिकाणी उमेदवार उभे करणार.
2. एससी आणि एसटी राखीव जागांवर जो आपल्याशी बांधील असेल त्यांना आपण पाठिंबा द्यायचा.
3. जिथे उमेदवार देणार नाहीत, तिथे जो बॉण्डवर शपथपत्र लिहून देईल की मराठा समाजाला आरक्षण देणार, त्याला आपण साथ देऊ.