जालना – मराठा आरक्षणाचा लढा कायम सुरु राहील. यांचा पोळा २५ दिवसांचा आहे. २५ दिवसांचा निवडणुकांचा पोळा संपला की मराठे पुन्हा भिडणार आहे. आपल्याला जिंकायचे आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगितले. तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, असिम सरोदे हे मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी आले होते. तरी आम्हाला त्यांचा तिकडे ओढ आहे, अशी कुणकुण लागली होती. ते आरक्षणावरच जास्तीत जास्त बोलले, त्यांना त्याबाबत चांगली माहिती आहे. त्यांनी १५- २० मिनिटे चर्चा केली. निवडणुकांबाबत माझ्याशी सर्वच चर्चा करतात, भाजपवालेही बोलत असतात, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात काय होईल ते १५ तारखेनंतर सांगतो. विधानसभेला उभे राहिलेले बंडखोर हे सरकारनेच उभे केले आहेत. तिकीटही त्यांनीच दिले आहेत. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. मी समाजासाठी जाणार आहे, कुणाला पाडायला जाणार नाही. मी नावही घेत नाही. जेवढे होईल तेवढ्या तालुक्यात जाणार आहे.आरक्षणाचा लढा कायम सुरु राहील. आमचा लढा आम्हाला जिंकायचा आहे. समाजात
दुफळी निर्माण होऊ द्यायची नाही. समाजाने माझ्या खांद्यावर मान टाकली. सहा कोटी मराठा समाजाला मान खाली घालावी लागली असती तर मला सहन झाले नसते. समाजाची मान उंचवावी असे काम करायचे होते. म्हणून समीकरण जुळत नसेल तर राजकारण नको असे ठरवले, असे म्हणत त्यांनी विधानसभेतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले.