मनोज घोरपडेंचा “रेकॉर्ड ब्रेक’ प्रचार दौरा

रहिमतपुर – कराड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांची मंगळवारी रहिमतपूर येथे पदयात्रेनंतर प्रचारसभा झाली. या प्रचारसभेला सर्वसामान्य जनतेने केलेली अफाट गर्दी ही विरोधकांना धडकी भरविणारी असून कराड उत्तरची जनता ही परिवर्तनाच्या लाटेवर स्वार झाली आहे.

आता ही जनताच विद्यमान आमदारांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशाराच मनोज घोरपडे यांनी यावेळी विरोधकांना दिला.
दरम्यान, प्रचारसभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली जनता हाच माझ्यासाठी विजय आहे, असे उद्‌गारही मनोज घोरपडे यांनी यावेळी काढले. धामणेर, सासुर्वे, बोरीव, कन्हेरखेड, जायगाव, पिंपरी, नेहेरवाडी वेलंग या गावामध्ये पदयात्रा झाली. त्यानंतर रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड उत्तरमधून मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता उपस्थित होती.

यावेळी झालेल्या विराट गर्दीने विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरली असून स्वयंस्फूर्तीने आलेल्या या अलोट गर्दीला संबोधताना अपक्ष उमेदवार मनोजदादा घोरपडे म्हणाले, आज इथे जमलेल्या अलोट जनसमुदाय पाहून कुणी कितीही ताकद लावली तरी कराड उत्तरमध्ये परिवर्तन होणारच, कारण ही लढाई एकट्या मनोज घोरपडेंची नसून ही सर्वसामान्य जनतेची प्रस्तापित निष्क्रिय आमदारांच्या विरोधातील लढाई आहे.

15 वर्षात जो विकास खुंटलेला आहे तो विकास येणाऱ्या 5 वर्षात मायबाप जनतेच्या आशिर्वादाने मार्गी लावणारच हा शब्द मनोज घोरपडे आज तुम्हाला देतोय. जायगावपासून, सदाशिवगडपर्यत व पुसेसावळीपासून मस्करवाडीपर्यंत प्रत्येक गावचा विकास हाच माझा ध्यास हे सूत्र अवलंबून माझी पुढील वाटचाल चालू राहणार आहे.

15 वर्षे कराड उत्तर मतदार संघात आमदारांचा ताम्रपट मिरवत सत्तेच्या नशेत राहणाऱ्या आमदारांनी कराड उत्तरला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले. स्वत:ला कार्यसम्राट म्हणून घेणाऱ्या आमदारांनी मतदार संघाचा काय विकास केला येथील सामान्य जनता जनता जाणून आहे. आमदारकी नसताना कराड उत्तरमधील जनतेसाठी केलेली विकास कामे मी सांगण्यापेक्षा सुज्ञ जनतेला ते माहीत आहे.

या मतदार संघातील घराणेशाहीचा अस्त होऊन परिवर्तन झाल्यावर फक्त मी आमदार होणार नाही तर कराड उत्तरची सर्वसामान्य जनता आमदार असेल.
यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर माने, पं. स. सदस्य अण्णासाहेब निकम, सुरेश पाटील, विकास अण्णा गायकवाड, पं. स. सदस्य संजय घोरपडे, रणजित माने, राजू केंजळे, डॉ. पवार, सुरेश माने,सचिन शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.