लक्षवेधी: नाही मनोहर तरी…

हेमंत देसाई

2019च्या लोकसभा निवडणुकांत भाजपचा मतहिस्सा हरियाणात 58 टक्‍क्‍यांवर गेला आहे आणि तेथील दहापैकी दहा जागा भाजपने जिंकल्या आहेत. एवढी सगळी अनुकूल परिस्थिती असताना, हरियाणाशी कसलाही संबंध नसलेले विषय उपस्थित केले जात आहेत, हे आश्‍चर्यच आहे. हरियाणातील हे चित्र “नाही मनोहर तरी’ असेच म्हटले पाहिजे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांच्या वक्‍तव्यांची पातळी घसरली आहे का, अशी चर्चा नेहमीप्रमाणे याही वेळी सुरू झाली आहे. पहिलवान, नटरंग, चंपा असे शब्दप्रयोग करण्यात आले व त्यामुळे वाद निर्माण झाला. तिकडे हरियाणातही विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात असून, भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल काढलेल्या उद्‌गारांवरून गोंधळ निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर खूपच दिवसांनी सोनियाजींची निवड करण्यात आली. त्यावर आक्षेपार्ह टिप्पणी खट्टर यांनी केली. तीन महिने बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर गांधी परिवारातील दुसरी व्यक्‍तीच निवडण्यात आली, असे त्यांना म्हणायचे होते. त्याकरिता म्हणीचा वापर केला.

हरियाणा कॉंग्रेस अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा या म्हणाल्या की, सोनियाजींविरुद्ध अशा प्रकारची शेरेबाजी करून, तुम्ही केवळ त्यांचाच नाही, तर सर्व महिलांचाच अपमान केला आहे.’ तसेच तुमच्यासारखी मानसिकता असलेल्या लोकांमुळेच हरियाणास गुन्हेगारीचे माहेरघर म्हटले जाते. स्त्रियांविरुद्ध अत्याचार वाढत आहेत आणि म्हणूनच सोनियाजींविरुद्धच्या वक्‍तव्याबद्दल जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
खरे तर, कॉंग्रेसने अध्यक्षपदाचा जो घोळ घातला, त्याला काहीही अर्थ नव्हता. केवळ विरोधी पक्षांनीच नव्हे, तर आनंद शर्मा, अभिषेक मनू सिंघवी, जयराम रमेश प्रभृती नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्‍त केली होती. नेतानिवडीतील या निर्णायकी स्थितीमुळे, राज्या-राज्यातील कॉंग्रेसजनांमध्ये निराशा पसरली.

बैठकांमागून बैठका झडत होत्या आणि त्यानंतर शेवटी तात्पुरती का होईना, पण सोनियाजींची निवड झाली. त्यामुळे पुन्हा घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी कॉंग्रेसने भाजपला मिळवून दिली. म्हणजे समजा, सोनियाजींची निवड करायची होती, तर ती आधीच करायची. त्यासाठी इतके दिवस का लावले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अहोरात्र तुटून पडणारे कॉंग्रेसजनांनी या टीकेत इतके गुंतून पडण्याचे कारण नाही. अशा टीकेला उत्तर देऊन, कॉंग्रेस पक्ष भाजपच्याच सापळ्यात अडकत आहे. खरे तर हरियाणाच्या निवडणुकीशी या विषयाचा काहीएक संबंध नाही; परंतु चर्चा तिकडे वळल्यामुळे हरियाणाचे प्रश्‍न आपोआपच मागे पडतात.

हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून, त्यापैकी 75 जागा आम्हाला मिळतील आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “सुपर पॉप्युलॅरिटी’ आणि केंद्र व राज्य सरकारांची कामगिरी जबाबदार असेल, अशी टिप्पणी भाजपचे नेते अनिल जैन यांनी केली आहे. ते भाजपचे हरियाणाचे प्रभारी सरचिटणीस आहेत. पक्ष राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मुद्द्यांचा वापर निवडणुकीत करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदींच्या करिष्म्यावर देशभर एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकता येत असल्यामुळे, भाजप जाणीवपूर्वक राष्ट्रीय मुद्द्यांचा वापर करतच आहे. मोदी सरकारने तिहेरी तलाकबंदीचा कायदा केला, तसेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एआऱसी)ची अंमलबजावणी केली. खेरीज जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम मोडीत काढले, याचा ठळक उल्लेख अनिल जैन यांनी केला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, राष्ट्रवादाचे आणि भावनात्मकतेचे मुद्दे उपस्थित करून भाजपला मते मिळवायची आहेत.

हरियाणाच्या स्थापनेपासून (1966) आतापर्यंतच्या काळात खट्टर सरकार हे असे एकमेव सरकार आहे, की ज्याने “लो प्रोफाइल’ राहून “हाय प्रोफाइल’ काम केले, असा भाजपचा दावा आहे. महाराष्ट्रातही अगोदरचे लोकशाही आघाडी सरकार भ्रष्ट होते आणि आम्ही मात्र स्वच्छ आहोत, असा देवेंद्र फडणवीस सरकारचा दावा असतो; परंतु फडणवीस सरकारातील अनेक मंत्र्यांवर गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

370व्या कलमाबद्दलच्या निर्णयामुळे हरियाणातील जातीच्या भिंती कोसळून पडल्या आहेत आणि भाजपची लोकप्रियता कळसाला पोहोचली आहे, असा युक्‍तिवाद खट्टर यांनी केला आहे. हरियाणा हा खाप पंचायत व जातवादाबद्दल प्रसिद्ध आहे; परंतु राष्ट्रवादाची भावना चेतवली, की सर्व जातीपातींची गणिते कोसळून मतांची बेरीज होते, हे भाजपला चांगले माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र, झारखंड व हरियाणात सध्या हाच फॉर्म्युला वापरला जात आहे.
कॉंग्रेस आणि चौटालांचा इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) हे हरियाणातील प्रमुख विरोधी पक्ष आहेत.

कॉंग्रेसचे नेते अशोक तन्वर यांनी दिल्लीत येऊन सोनियाजींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केल्यामुळे, हरियाणा कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले. दोन आठवड्यांपूर्वीच तन्वर यांनी कॉंग्रेसचा त्याग केला आहे. तन्वरांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे माजी कोषाध्यक्ष तरुण भंडारी यांनी तर भाजपमध्ये थेट प्रवेशच केला आहे. कॉंग्रेसचे शक्‍य तिथे नुकसान करणे, हा तन्वर यांचा अजेंडा असणार आहे. आयएनएलडीमध्येही फाटाफूट झाली आहे आणि नोकरभरतीतील भ्रष्टाचाराबद्दल हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना तुरुंगवास झाला आहे. त्यामुळे हरियाणातही भाजपला तसे आव्हानच नाही, असे चित्र मतदारांसमोर उभे राहीले तर त्यात चूक कोणाची?
सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी प्रचाराला जोर लावलेला आहे. घरोघरी जाऊन उमेदवार प्रचार करीत आहेत.

आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी मोठमोठे नेतेही प्रचारसभा गाजवत आहेत. सत्ताधारी व विरोधक आपली बाजू मांडताना दिसत आहेत. जनतेने मतदान करावे यासाठीही मतदार जागृती केली जात आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत मतदारराजा कोणाला कौल देतो हे हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईलच.

Leave A Reply

Your email address will not be published.