बारामती – संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यात ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अटकेची कारवाई करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा तर बारामतीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून मनोहरमामा चर्चेत आहे. त्यांनी अनेक भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात त्यांनी पुण्यात आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेत या आरोपांचे खंडन केले होते.
करमाळा पोलीस स्टेशनमध्ये थेट लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. एक महिला भक्त घरगुती अडचणींमुळे मनोहरमामा यांचा सल्ला घेण्यासाठी काही महिन्यापूर्वी करमाळा तालुक्यातील उंदरागाव येथील मठात आली होती. यावेळी तिला तीन वाऱ्या करण्यास सांगण्यात आले. यावेळी आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार आता या महिलेने दिली असून आर्थिक फसवणूक झाल्याचेही तिने करमाळा पोलिसांना सांगितले होते. यावरून करमाळा पोलिसांनी मनोहर मामाविरोधात गुन्हा दाखल केला होता.
बारामती येथेही एका आजारी भक्ताला बरे करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बारामती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. बारामती येथील शशिकांत खरात यांच्या वडिलांना गळ्यातील थायरॉईड कॅन्सर आहे. त्यांना बरे करतो म्हणून मनोहरमामा यांनी खरात यांचेकडून 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार खरात यांनी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती. अखेर मनोहर मामाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.