“मन की बात’मधून पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन, ‘लसीकरणाशिवाय कोणीही राहू नये’

नवी दिल्ली – सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर देशवासियांनी कोविड-19 अनुकूल वर्तन करावे आणि करोना विरोधी लसीकरणापासून कोणीही बाकी राहू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. “मन की बात’ या आपल्या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हे आवाहन केले. “युपीआय’ द्वारे सर्वसामान्य नागरिक आता डिजीटल व्यवहारांशी जोडले जात आहेत. त्याचे प्रमाणही आता दिवसेंदिवस वाढत चालले आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

आगामी काळात देशभर सण साजरे केले जाणार आहेत. नागरिकांनीही कोविडविरोधातील लढाईला ध्यानात ठेवले पाहिजे. करोनाविरोधातील लढाईत भारत लसीकरणाच्या संदर्भाने दररोज नवनवीन उद्दिष्टे साध्य करत आहे, भारताकडून केल्या जात असलेल्या लसीकरणाच्या विक्रमाची जगभर चर्चा होत आहे. त्यामुळे कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

देशातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी तामिळनाडूतील वेल्लोर आणि तिरुवनंतमलाई येथील ग्रामसहभागाचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आर्थिक स्वच्छता अभियानाला देशभर चालवण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. जनधन खात्यांमुळे आज गरिबांचा, त्यांच्या हक्काचा पैसा, थेट, सरळ त्यांच्याच खात्यात जातो आहे, त्यामुळे भ्रष्टाचारासारखे व्यत्यय, खूप प्रमाणात कमी झाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने देशवासियांनी खादीचा वापर वाढवावा, असेही त्यांनी सुचवले. काही दिवसांपूर्वीच दिव्यांग व्यक्तींच्याएका चमूने सियाचीन ग्लेशियरच्या 15 हजार फुटांपेक्षा देखील जास्त उंचीवर असलेल्या ‘कुमार पोस्ट’ वर आपला झेंडा फडकवून जागतिक विक्रम केला, त्यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.