पुढील महिन्यात समाप्त होणार सदस्यत्वाची मुदत
नवी दिल्ली -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात समाप्त होणार आहे. त्यानंतर त्यांना काही काळ राज्यसभेपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.
राज्यसभा सदस्य म्हणून मनमोहन यांची सहा वर्षांची मुदत 14 जूनला समाप्त होत आहे. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यांच्यासह आसाममधील कॉंग्रेसच्या दोन्ही सदस्यांची मुदत एकाच वेळी संपणार आहे. रिक्त होणाऱ्या त्या दोन्ही जागांसाठी निवडणूक आयोगाने 7 जूनला निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे.
मनमोहन यांना पुन्हा त्याच जागेवरून निवडून देण्यासाठी आवश्यक संख्याबळ कॉंग्रेसकडे नाही. त्यामुळे मनमोहन यांना पुन्हा राज्यसभा सदस्य बनवायचे कॉंग्रेसने ठरवले तरी त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कॉंग्रेसने काही राज्यांत राज्यसभा सदस्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांच्यातील कुणी जिंकल्यानंतर राज्यसभेतील एखाद्या जागेवर मनमोहन यांची निवड केली जाऊ शकते.
त्याशिवाय, तामीळनाडूतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 6 जागा जुलैमध्ये रिक्त होणार आहेत. त्या राज्यातील कॉंग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या द्रमुकने मनमोहन यांच्यासाठी एखादी जागा सोडण्याची तयारी दर्शवली तर त्यांची सोय होऊ शकते. अन्यथा, मनमोहन यांना एप्रिल 2020 पर्यंत वाट पहावी लागू शकते. त्यावेळी विविध राज्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 55 जागा रिक्त होणार आहेत. त्यातील काही जागा कॉंग्रेस पक्ष पटकावू शकतो. त्यातील एखादी जागा मनमोहन यांच्या वाट्याला येऊ शकते.