नवी दिल्ली – भारताच्या आर्थिक उदारीकरण प्रक्रियेचे प्रणेते व देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा आज 89 वा वाढदिवस होता. यानिमीत्त अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांना ट्विटरवर शुभेच्छा देताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मनमोहनसिंग हे एक दूरदृष्टीचे प्रखर देशभक्त नेते आहेत. आपल्या शब्दाला जागणारे ते खऱ्या अर्थाने संपुर्ण देशाचे नेते आहेत. आपण देशासाठी आजवर व रोज देत असलेल्या योगदानाबद्दल देश आपला श्रृणी आहे असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाच्यावतीनेही त्यांना यानिमीत्ताने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मनमोहनसिंग यांच्या योगदानाचा अभुतपुर्व लाभ देशातील प्रत्येक नागरीकाला झाला आहे असे कॉंग्रेस पक्षाच्या शुभेच्छा संदेशात नमूद करण्यात आले आहे.
देशात 1991 साली मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना आर्थिक उदारीकरणाची मोहीम सुरू केली. देशातील परमीट आणि लासन्सन राज त्यांनी रद्द केले. त्यानंतर देशाच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आणि देश एका वेगळ्या आर्थिक उंचीवर गेला.
पुढे पंतप्रधान पदाच्या काळातहीं मनमोहनसिंग यांनी आर्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरू ठेऊन देशात सुबत्ता आणली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही मनमोहनसिंग यांना शुभेच्छा देताना त्यांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला आहे.