नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सोमवारी करोना संसर्ग झाल्याने उपचारासाठी येथील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. 88 वर्षीय सिंग यांना सकाळी सौम्य स्वरूपाचा ताप आला. त्यानंतर त्यांची करोनाविषयक चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रूग्णालयातील डॉक्टर सिंग यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेऊन आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सिंग यांनी याआधीच करोनालसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
सिंग लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. सध्याच्या कठीण काळात सिंग यांच्या मार्गदर्शनाची आणि सल्ल्याची देशाला गरज आहे, अशी भावना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.