मनमोहन येणार पण सामान्य भाविक म्हणून…

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची माहिती, प्रमुख पाहूणे म्हणून येण्यास नकार
मुल्तान : श्री गुरूनानक देव यांच्या 550व्या जयंतीनिमित्त नऊ नोव्हेंबरला खुल्या होणाऱ्या कॅरिडोरला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याऐवजी मी कर्तारपूरसाहिब गुरूद्वारात एक सामान्य भाविक म्हणून नंतर दर्शनासाठी जाईन, असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कळवले असल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी केला.

मुल्तान येथे पत्रकारांशी बोलताना कुरेशी म्हणाले, मनमोहनसिंग यांनी मला पाठवलेल्या पत्रात गुरूद्वाराला भेट देण्याचे निश्‍चित केले आहे. मी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना निमंत्रित केले होते. मला त्याचे पत्र पाठवून उत्तर दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी येणार आहे. पण, प्रमुख पाहुणा म्हणून नव्हे तर एक सामान्य माणूस म्हणून, असे त्यांनी कळवले आहे. ते सामन्य नागरिक म्हणून येणार असले तरी आम्ही त्यांचे स्वागत करणार आहोत, असे कुरेशी म्हणाले.

यापुर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी मनमोहनसिंग यांना कॅरिडोरच्या उद्‌घाटनासाठी औपचारिक निमंत्रण या महिन्याच्या सुरवातीला दिले होते. मात्र कॅरिडोरच्या उद्‌घाटनासाठी पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही समारंभास मनमोहनसिंग उपस्थित राहणार नाहीत, असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केले होते.

पाकिस्तानातील दरबार साहिब आणि गुरूदासपूरमधील डेरा बाबा नानक या दरम्यान हा कॅरिडोर उभारण्यात येणार आहे. त्यातून रोज पाच हजार शिख भाविकांना नरोडवाल येथील दरबार साहीब येथे दर्शनासाठी जाता येईल. गुरूनानक देव अखेरच्या काळात येथे वास्तव्यास होते, असे मानले जाते. हा कॅरिडोर एकून सहा किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.