मल्याळम ऍक्‍ट्रेस मंजू वारियर अडकली पूरामध्ये

गेल्या काही आठवड्यांपासून दक्षिणेतल्या 4 राज्यात आणि आता उत्तरेतल्याही काही राज्यांम्ध्ये अतिवृष्टीमुळे पूराची स्थिती निर्माण झाली आहे. दरडी कोसळल्याने रस्तेही बंद झाले आहेत. अशातच हिमाचल प्रदेशात शुटिंगला गेलेली मल्याळम सुपरस्टार मंजू वारियर आणि तिच्याबरोबरची सगळी टीम हिमाचलमधील छत्रू इथे पूरातच अडकून पडली होती. मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक प्रमुख रस्ते बंद झाले होते. त्यामुळे या टीमला सोडवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

मंजू वारियरसह 30 ते 40 जणांची टीम तिथेच अडकून पडली होती. त्यांच्याकडे केवळ एकच दिवस पुरेसा अन्नाचा साठा होता. कोणाशी संपर्कही करता येत नव्हता, कारण सगळीकडचे लॅन्डलाईन फोन बंद पडले होते. मंजूने डोके वापरून सॅटेलाईट फोनद्वारे आपल्या भावाशी संपर्क साधला.

तिच्या भावाने मूळचे केरळचे असलेल्या केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर चक्रे फिरली आणि या टीमला सुखरूप सोडवण्यात आले. मंजू वारियरने 1995 साली मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर चारच वर्षात तिने 20 सिनेमे केले. थोडा ब्रेक घेतल्यावर तिने आता पुन्हा ऍक्‍टिंगला सुरुवात केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×