नवी दिल्ली – वादग्रस्त विधाने केल्यामुळे डच्चू देण्यात आलेल्या माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या पथकात अखेर पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात मालिकेचे हक्क ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे असल्याने बीसीसीआयला देखील मांजरेकर यांच्याबाबत आपली नापसंती दर्शवता आलेली नाही.
भारतीय संगाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. येत्या 27 नोव्हेंबर पासून या क्रिकेट दौऱ्याला सुरूवात होणार आहे. करोनानंतरचा भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. मार्च महिन्यात मांजरेकर यांना या पथकातून वगळले गेले होते. त्यानंतर त्यांनी आयपीएल स्पर्धेपूर्वी बीसीसीआयकडे माफिनामाही पाठवला होता.
मात्र, तरीही त्यांना त्यावेळी स्थान नाकारले होते. आता मात्र, त्यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमान पदाचे हक्क ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे असल्याने समालोचक निवडण्याचे अधिकारही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे समालोचक निवडण्याचे अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे समालोचन समितीत मांजरेकर यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मांजरेकर यांच्यासह ग्लेन मॅकग्रा, निक नाईट, हर्षा भोगले, अजय जाडेजा, मुरली कार्तिक तसेच अजित आगरकर यांचा या पथकात समावेश आहे. तसेच हिंदी समालोचकांच्या पथकातही ते काही काळ कार्यरत राहू शकतील. या पथकात विरेंद्र सेहवाग, झहीर खान, विजय दहीया, महंमद कैफ, विवेक राजदान आदींचा समावेश आहे.