मांजरी बुद्रुक रेल्वेगेट १८ जूनपासून अनिश्चित काळासाठी बंद; ‘या’ पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन

विवेकानंद काटमोरे

मांजरी – दौंड रेल्वे मार्गावरील मांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्रमांक 3 येथे उड्डाण पुलाचे तसेच भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येत आहे.त्यामुळे हे रेल्वेगेट शुक्रवारी , दि-18 जून पासून वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेगेट अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे.त्यामुळे मांजरी – केशवनगर- मुंढवा तसेच मांजरी- भापकर मळा – सोलापूर महामार्ग या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन हडपसर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

या ठिकाणी होत असलेल्या उड्डाणपूलाचे काम गेटच्या दोन्ही बाजूने ऐंशी टक्केपर्यंत पूर्ण झालेले आहे. यापुढे थेट रेल्वेमार्गावरील काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी तसेच भुयारी मार्गाच्या कामासाठी सध्या सुरू असलेली येथील वाहतूक काम होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचे काम रेल्वेकडून करण्यात येत आहे.

तर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू जोडणारे मुख्य पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. भुयारी मार्गाचे काम झाल्यानंतर लगेचच पादचारी व हलक्या वाहनांसाठी येथील वाहतूक सुर होईल. तर, उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर इतर वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी थेट पुलावरूनच वाहतूक सुरू होईल.

रोड ओवर ब्रिज व रोड अंडर ब्रिज कामानिमित्त रेल्वे फाटक बंद.

पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील हडपसर – मांजरी रेल्वे स्टेशन दरम्यान असलेले रेल्वे फाटक क्रमांक 3 A मांजरी स्टेशनला लागून जे रेल्वे कि.मी. 202/ 1-2 वर आहे, या ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज व भुयारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे हे रेल्वे फाटक 18 जूनपासून पुढील सुचनेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल.

  • मनोज झवर जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग पुणे मंडल

” रेल्वेगेट बंदच्या काळात मांजरी-वाघोली रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस तीन पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. हलक्या वाहनांनी मांजरी बुद्रुक- केशवनगर – साडेसतरानळी व भापकरमळा – सोलापूर महामार्ग याचा वापर करावा. तर जड वाहनांनी खराडी- मुंढवा -मगरपट्टा बायपासने वाहतूक करता येईल. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी त्याबाबतचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.’

– दादासाहेब चुडाप्पा वाहतूक पोलीस निरीक्षक, हडपसर

मांजरी बुद्रुक रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे.सध्या रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे काम रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंचा उतार आणि सर्व्हिस रोडचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरूच राहणार आहे.

– नानासाहेब परभणे शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.