सातारा – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्तरावर सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने द्वितीय, बनवडी (ता. कराड) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. स्वच्छता अभियानात जिल्ह्याचा डंका कायम राहिल्याने आनंदोत्सव साजरा होत आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत 2018 -19 अंतर्गत विभागस्तरीय समितीने पडताळणीचा चौथा टप्पा पूर्ण केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींची काही दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली. या तपासणीनुसार पुणे विभागात कान्हेवाडी तर्फ चाकण (ता. खेड जि. पुणे) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवला.
यापूर्वी विभाग स्तरावर या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवल्याने बक्षीसाची रक्कम मिळणार नाही. ठिकेकरवाडी (ता. जुन्नर) व मान्याचीवाडी या ग्रामपंचायतींना विभागून व्दितीय क्रमांक देण्यात आला आहे. मान्याचीवाडीला यापूर्वी पुरस्कार मिळाला असल्याने ग्रामपंचायत ठिकेकरवाडीस पुरस्काराची रक्कम देण्यात येणार आहे.
शृंगारवाडी (ता. आजरा जि. कोल्हापूर) आणि मांडवे (ता. माळशिरस) या ग्रामपंचायतींना विभागून बक्षीस देण्यात येणार आहे. बनवडी आणि साबळेवाडी (ता. मिरज) या ग्रामपंचायतींना विभागून बक्षीसे देण्यात येणार आहेत. या पुरस्काराची घोषणा उपायुक्त राजाराम झेंडे यांनी केली.