शिक्षण समिती सभापतिपदी मनिषा पवार

बिनविरोध निवड : आमदार जगताप गटाची सरशी

ही आहेत समितीची कामे

प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्‍तीचे करून ते उपलब्ध करुन देणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील जवळची शाळा उपलब्ध करणे, शाळेसाठी पायाभूत सुविधा पुरविणे, स्थलांतरित कुटुंबातील बालकांना प्रवेश, उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण देणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुविधा पुरविणे, शैक्षणिक दिनदर्शिका ठरविणे या जबाबदाऱ्या समितीसाठी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदी भाजपच्या मनिषा पवार यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या त्या समर्थक मानल्या जातात. त्यामुळे जगताप गटाची सरशी झाली आहे.

महापालिका शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती नव्याने स्थापन करण्यात आली. या शिक्षण समितीच्या पवार या दुसऱ्या सभापती आहेत. यापूर्वी आमदार महेश लांडगे समर्थक प्रा. सोनाली गव्हाणे यांना सभापतीपद मिळाले होते. त्यानंतर आता जगताप गटाला पक्षनेतृत्वाने संधी दिल्याचे या निवडीवरुन स्पष्ट झाले आहे.

शिक्षण समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. सत्ताधारी भाजपच्या मनिषा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. विरोधकांनी अर्ज भरला नसल्याने पवार यांची बिनविरोध निवड निश्‍चित होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या त्या समर्थक समजल्या जातात.

महापालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात दुपारी बारा वाजता सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया झाली. पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्यानुसार महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती अस्तित्वात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण समिती स्थापन करण्यात आल्यानंतर नगरसेवक हेच सभासद असतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसार नऊ जणांची महापालिकेच्या शिक्षण समितीवर निवड करण्यात आली. यातून मनिषा पवार यांची सभापतीपदी निवड झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.