Ias Transferred : जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर असतानाच राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 1992 बॅचच्या IAS अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मनीषा म्हैसकर पाटणकर यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. डॉ. आय. एस. जहल यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी आता मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनीषा म्हैसकर पाटणकर कोण आहेत? मनीषा म्हैसकर पाटणकर या 1992 सालच्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी, मुंबई विक्रीकर उपआयुक्त, अमरावती महानगरपालिका आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या माहिती महासंचालकपदीही कार्यरत होत्या. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मिलिंद म्हैसकर कोण आहेत? मिलिंद म्हैसकर हे देखील 1992 बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय जिल्हा परिषद निवडणुका सुरू असतानाच हे बदल करण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रशासन अधिक प्रभावीपणे चालावे, यासाठी हे बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.