Heeramandi 2 | Manisha Koirala : बॉलिवूड अभिनेत्री ‘मनीषा कोईराला’ने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या डेब्यू वेब सीरिजमधून जोरदार पुनरागमन केले. अनेक स्टार्सची भूमिका असलेली ही मालिका 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. पहिल्या सीझनपासून लोक दुसऱ्या सीझनबद्दल प्रश्न विचारत होते. आता मनीषा कोईराला हिने हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनचे मोठे अपडेट दिले असून पुढील वर्षी त्याचे शूटिंग सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत मनीषा कोईराला हिरामंडी 2 बद्दल म्हणाली, “पुढच्या वर्षी त्याचे शूटिंग सुरू होईल. आम्ही सर्व परत येण्याची वाट पाहत आहोत.” यादरम्यान मनीषाला जेव्हा विचारण्यात आले की, हिरामंडीच्या यशानंतर तिला आणखी प्रोजेक्ट्सच्या ऑफर आल्या का? यावर मनीषा म्हणाली की, काही स्क्रिप्ट्सवर चर्चा सुरू आहे. मात्र, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आपण कोणतीही माहिती शेअर करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.
चित्रपट प्रवासाबद्दल म्हणाली…
यावेळी मनीषा कोईरालाने तिच्या चित्रपट प्रवासाविषयी सांगितले. ती म्हणाले की, 30 वर्षांपूर्वी लोकांचा असा विश्वास होता की चित्रपट उद्योग नकारात्मक आणि वाईट गोष्टींनी भरलेला आहे. पुढे सांगितले, “त्यावेळी चांगल्या कुटुंबातील मुलींना चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणे खूप कठीण होते. सौदागर आणि इतर काही चित्रपटांच्या यशानंतर त्यांच्या अभिनयावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी त्यांचे कौतुक करायला सुरुवात केली, असे सुद्धा अभिनेत्री म्हणाली.
हीरामंडी कोणते कलाकार झळकले?
हिरामंडी हा संजय लीला भन्साळी यांचा मोठा प्रकल्प होता. जवळपास 60 हजार लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सने सेट उभारण्यासाठी 700 कारागिरांच्या टीमने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सात महिने काम केलं होतं. या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मीन सेगल, फरदीन खान, ताहा शाह बदुशाह, अध्यायन सुमन, शेखर सुमन आणि जेसन शाह यांसारखे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.
‘हिरामंडी’ची कथा थोडक्यात…
‘हिरामंडी’ची कथा अत्यंत रंजक आहे. हिरामंडी हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या. त्यामुळे या सीरिजची कथा प्रेक्षकांसाठी फार रंजक ठरली.