चित्रपटसृष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री असणारी मनीषा कोईराला मागील काळात सर्वत्र चर्चेत आली तिला जडलेल्या दुर्धर कर्करोगाच्या आजाराने. प्रचंड संघर्ष करत या आजारावर मनीषाने मात करून कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी एक आशेचा किरण जागवला.
आज ती कर्करोगाने ग्रस्त पीडितांना जगण्यासाठी प्रोत्साहन देत असते. अलीकडेच मनीषा मुंबईमधील एका रुग्णालयात दिसली. यावेळी ती भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बलुनी यांना भेटण्यासाठी आली होती. बलुनी हे कर्करोगाशी झुंज देत आहेत. मनीषाशी झालेल्या भेटीनंतर बलुनींनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून सोबत मनीषाला धन्यवादही दिले आहेत.
कर्करोगाविरोधातील लढाईमध्ये मनीषाच्या भेटीने माझी उमेद वाढली आहे, असे त्यांनी लिहिले आहे. मनीषाने या भेटीदरम्यान बलुनी यांच्याशी आपल्या संघर्षकाळातील काही आठवणी शेअर केल्या. तिची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरली, असे बलुनी सांगतात. बलुनी हे उत्तराखंडमधून राज्यसभेवर खासदार आहेत.