देशावर हल्ला होऊनही कॉंग्रेस सरकार शांत राहिले – काॅंग्रेस नेत्याच्या दाव्यामुळे नवा ‘वाद’

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकातील तपशिलावरून निर्माण झालेला वाद अजून कायम असतानाच आता आणखी एक कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. भारतावर 26/11 ला झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानवर त्वरेने कारवाई करायला हवी होती, पण असा तातडीचा प्रतिसाद देण्यात हे सरकार कमी पडले असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने झटकन हा मुद्दा उचलून धरीत तत्कालीन कॉंग्रेस सरकारवर टीका सुरू केली आहे. कॉंग्रेस सरकारच्या अपयशाचीच ही कबुली आहे असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे.

सलमान खुर्शिद यांनी भारतातील कट्टर हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि इसिस या दोन इस्लामिक कट्टरपंथीय संघटनांशी केली होती. त्यावरूनही भाजपने कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांना मनीष तिवारींच्या पुस्तकाने आणखी एक कोलीत दिले आहे. भाजपचे प्रवक्‍ते गौरव भाटिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की देशावर हल्ला होऊनही कॉंग्रेस सरकार शांत राहिले.

याचा अर्थ ते राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कधीच गंभीर नव्हते याचाच हा दाखला आहे. यावर सोनिया गांधी, राहुल गांधी का गप्प आहेत, असा सवालही भाटिया यांनी केला आहे. मनीष तिवारी यांचे हे चौथे पुस्तक आहे. त्यात त्यांनी गेल्या दोन दशकातील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आपले मत प्रदर्शन केले आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर द्यायला हवे होते पण त्यात भारत सरकार कमी पडले असे विधान त्यांनी यात केले आहे. मनीष तिवारी हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.