Manish Sisodia : भारतीय जनता पक्ष विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेच्या माध्यमातून मतदार याद्यांमधून लोकांची नावे वगळण्याचा कट रचत आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी मंगळवारी केला. आम्ही एकाही पंजाबी व्यक्तीचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पंजाबमधील मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यापासून रोखणे हा मुख्य अजेंडा ठेवून मंगळवारी आपच्या कार्य समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह पंजाबचे कॅबिनेट मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ही नवीन राजकीय चाल खेळल्याची टीका आप नेत्यांनी केली. सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्यानंतर आता भाजप एसआयआरच्या माध्यमातून पंजाबमधील लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. Manish Sisodia भाजपने यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या धाडी टाकून विरोधी नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आणि आता ते थेट मतेच कमी करण्याची योजना आखत आहेत. लाखो पंजाबी मतदारांची नावे यादीतून काढून त्यांचे लोकशाही हक्क हिरावून घेण्याची तयारी सुरू आहे. आम्ही या समस्येकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून मतदान केंद्र पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत कडक देखरेख ठेवली जाईल. भाजपला पंजाबविरोधी संबोधत, भाजप पंजाबची संसाधने आणि संस्थांवर ताबा मिळवण्याचे धोरण राबवत असल्याचा आरोप सिसोदियांनी केला. चंदिगढ, भाक्रा धरण आणि पंजाब विद्यापीठावरील आपला प्रभाव वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असून आता ते पंजाबची राजकीय ताकद कमी करण्यासाठी एसआयआरचा वापर करत असल्याचे ते (Manish Sisodia) म्हणाले.