नवी दिल्ली – दिल्लीच्या नागरीकांना मोफत वैद्यकीय चाचण्या तेथील राज्य सरकारने देऊ केल्या आहेत, पण त्या प्रस्तावाचीही फाइल दिल्लीचे राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी अद्याप मंजुर केलेली नाही. ही फाइल राज्यपालांकडे दोन आठवड्यांपासून प्रलंबित आहे असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
जर राज्यपालांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही तर मोफत वैद्यकीय चाचण्या चालू ठेवता येणार नाहीत. 1 जानेवारीपासून दिल्लीतील सर्व रुग्णालयांमध्ये मोफत चाचण्या बंद केल्या जातील, असे सिसोदिया यांनी माध्यमांना सांगितले.
यापूर्वी 13 डिसेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. व ती फाइल राज्यपालांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती.
1 जानेवारी 2023 पासून दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये एकूण 450 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत मिळणार होत्या. परंतु राज्यपालांच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरीकांना या सुविधांनाही वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.