अमान (जॉर्डन) – भारताची महिला महिला बाॅक्सरपटू साक्षी चौधरी आणि पुरूष बाॅक्सरपटू मनीष कौशिक यांना आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी बाॅक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.
स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात 63 किलो वजनी गटात मंगोलियाच्या चिनजोरिग बातारसुख याने मनीषचा 3-2 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत जरी मनीषचा पराभव झाला असला तरी त्याला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळू शकते. कारण या वजनी गटात अद्याप 6 खेळाडूंना ऑलिम्पिक कोटा मिळालेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंत सामने होणार असून यात जर चांगली कामगिरी केली तर मनिषला ऑलिम्पिक कोटा मिळविण्याची संधी आहे.
दरम्यान, दुसरीकडे महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्वफेरीत साक्षी चौधरीला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे तिच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.