मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या भावाचे अपहरण; कोलकत्यात सुटका

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्यांचे कृत्य
कोलकता : मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या भावाचे पश्‍चिम बंगालमधून अपहरण झाल्याच्या घटनेने काही काळ खळबळ उडाली. मात्र, बंगाल पोलिसांनी तातडीने हालचाली करत सिंह यांच्या भावाला कोलकत्यात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवले.

सिंह यांचे भाऊ तोंगब्राम लुखोई सिंह हे कोलकत्यात भाड्याच्या घरात राहतात. त्या घरात शुक्रवारी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून पाच जण घुसले. त्यांच्याकडे बंदुका होत्या. ते तोंगब्राम आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला त्यांच्या समवेत घेऊन गेले. काही वेळाने सीबीआयचे अधिकारी म्हणवणाऱ्यांनी तोंगब्राम यांच्या पत्नीला फोन केला. पतीच्या सुटकेसाठी 15 लाख रूपये खंडणी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे तोंगब्राम यांचे अपहरण करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. तोंगब्राम यांच्या पत्नीने पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदवली.

त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मध्य कोलकत्यात अपहरणकर्त्यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या बंदुका खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तोंगब्राम आणि त्यांच्या सहकाऱ्याची सुटका करण्यात आली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांपैकी दोघे मणिपूरचे, एक जण पंजाबचा तर उर्वरित दोघे कोलकत्याचे रहिवासी आहेत. मणिपूरमध्ये अपहरणाचा कट शिजला. तिथून एका व्यक्तीने दिलेल्या निर्देशांवरून अपहरणकर्ते हालचाली करत होते. पैशांसाठीच अपहरणाचा कट रचण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात, थेट मुख्यमंत्र्यांच्याच भावाचे अपहरण करण्यात आल्याने त्यामागे आणखी कुठला उद्देश आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.