नवी दिल्ली – मणिपूरमधील दोन महिलांच्या न्यूड व्हिडिओवर सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांनी चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्राला सांगितले की, व्हिडिओ पाहून आम्ही खूप व्यथित झालो आहोत. दोषींवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे आणि याप्रकरणी केंद्राकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाबाबत केंद्र आणि मणिपूर राज्य सरकारने काय पावले उचलली आहेत, अशी विचारणा सरन्यायाधिशांनी केली आहे.
न्या. चंद्रचुड म्हणाले की, महिलांच्या हक्काबाबत घडलेला हा प्रकार अंत:करणाला हादरवून सोडणारा आहे. हे संविधानाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. लोकशाहीत अशा घटना कदापीही मान्य होऊ शकत नाहीत. येत्या शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
न्या. चंद्रचुड पुढे म्हणाले की, मणिपूरमधील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या संदर्भात काल समोर आलेल्या व्हिडिओमुळे न्यायालय अत्यंत अस्वस्थ आहे. प्रसारमाध्यमांमध्ये दिसणारे व्हिज्युअल गंभीर हिंसा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन दर्शवतात. अशा वातावरणात महिलांचा हिंसाचाराचे साधन म्हणून वापर करणे अस्वीकारार्ह आहे. दोषींना पकडण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती न्यायालयाला दिली जावी, असे आमचे मत आहे.