संतोष पवार
मटण भाकरी, थालीपीठ, पुरणपोळीपासून सबकुछ; गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांची रेलचेल
सातारा – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि सातारा जिल्हा परिषद यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित मानिनी जत्रेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात असलेल्या 180 स्टॉल्सवर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मटण-भाकरी, थालपीठ, पुरणपोळीपासून विविध गृहोपयोगी वस्तू व खाद्य पदार्थांची या प्रदर्शनात रेलचेल दिसून येत आहे.
“मानिनी जत्रा’ 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात विविध रुचकर खमंग पदार्थ तसेच विविध कलाकुसर असणाऱ्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू याचबरोबर दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी या प्रदर्शनात आहे. कोरेगावचे थालीपीठ, कराडची हळद, साताऱ्याची पुरणपोळी, खंडाळ्याची चिक्की, खटावची खेळणी असे सर्वच प्रकार एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
विविध पदार्थांची लज्जत घेण्यासाठी सातारकरांनी प्रदर्शनात मोठी गर्दी होत आहे. कला, संस्कृती जपणारी मानिनी जत्रा’ निश्चितच सातारकरांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. प्रदर्शनात दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होत असून या कार्यक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रदर्शनावर “सीसीटीव्ही वॉच’
मानिनी जत्रा प्रदर्शन 17 फेब्रुवारी अखेरपर्यंत चालणार असून या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी सातारकरांनी केली होती. प्रदर्शनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. याचबरोबर प्रदर्शनात प्लॅस्टिक मुक्तीचा नारा देण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आवाहन केले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्यांदाच प्रदर्शनास मोठा प्रतिसाद
“मानिनी जत्रा’ हे प्रदर्शन शासनाच्या माध्यमातून भरवण्यात येत असल्याने प्रदर्शन भरवताना अनेक मर्यादा येत होत्या. निधीचीही कमतरता होती. मात्र यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी सुरुवातीपासून प्रदर्शन यशस्वी आणि भव्यदिव्य होण्यासाठी प्रयत्न केले. शासनाच्या स्टॉल्स व्यतिरिक्त खासगी स्टॉल्सलाही सहभागी करुन घेतल्याने पहिल्यांदाच प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक मान्यवर या प्रदर्शनास भेट देत असून उत्कृष्ट नियोजनबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.
प्रदर्शनात हे मिळेल….
या प्रदर्शनात सेंद्रीय हळद, हळद लोणचे, गाईच्या शेणापासून बनवलेली उदबत्ती, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, अनारसे पीठ, खेळणी, शोपीस, रेडिमेड कपडे, सेंद्रीय गुळ, काकवी, मसाले, शेवया, नाचणी, बाजरी, मका, सेंद्रीय उत्पादने, डाळी, पापड, हस्तकला वस्तू, कडधान्ये, चप्पल, शूज, विविध प्रकारची बिस्किट,लोणचे, सांडगे, चुरमुरे, चना, साड्या, लाकडी वस्तू, चिक्की, सर्व प्रकारचे मसाले, सॉफ्ट टॉईज, थालीपीठ, मसाला डोसा, पुरणपोळी, पाव भाजी, पाणी पुरी, चिकन, मटण थाळी, बिर्याणी, मटण भाकरी, मच्छी फ्राय, कोमडी वडे, सुकट पाव, गावरान चिकण, रसवंती गृह आदी विविध प्रकारचे स्टॉल्स असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मानिनी जत्रा म्हणजे सातारकरांसाठी एक मेजवानी असून गोरगरीब महिलांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने मानिनी जत्रेचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. शासकीय बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात काही खासगी स्टॉल्सही सहभागी करुन घेण्यात आले असून प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळत आहे.
अविनाश फडतरे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा.