नवी दिल्ली – भारताची अव्वल मानांकित टेबल टेनिसपटू मनिका बात्रा टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने सध्या तयारी करत आहे. या स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचा निर्धारही तिने व्यक्त केला आहे.
मनिकाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तिने यासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाचे आभारही मानले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, दक्षिण आशियाइ स्पर्धा व सातत्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला खूप अनुभव मिळाला. यातून खूप काही शिकता आले. टेबल टेनिस महासंघ लवकरच सराव केंद्र सुरू करण्याच्या विचारात असल्याचे समजल्यावर खूप आनंद झाला. आता पुढील काळात होत असलेल्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तयारीच्या दृष्टीने सराव करता येणार आहे. मात्र, पुढील काही काळ तरी वैयक्तिक सरावच करावा लागणार आहे. सांघिक सराव करोनाचा धोका संपूर्ण संपल्यावरच करता येईल. अर्थात सराव करण्याची संधी मिळाली तरी खेळाडू सध्याच्या निराशापूर्ण मानसिकतेतून बाहेर येतील, असेही मनिका म्हणाली.
सध्या करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने खेळाडूंच्या एकत्रित सरावावर बंधने आहेत. तसेच देशातील विविध क्रीडा संकुले खुली करण्यात आली असली तरीही काही खेळाडू सीमाबंदी असल्याने अशा केंद्रांत जाऊ शकत नसल्याने मनिकाला देखील घराजवळील कोर्टवर सराव करावा लागत आहे. मात्र, या सरावात ती प्रत्यक्ष खेळाच्या सरावापेक्षाही जास्त तंदुरुस्तीचे व्यायाम करण्यावर भर देत आहे.
2018 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदकाची कमाई केली होती. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात टेबल टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटात सुवर्णपदक जिंकणारी मनिका भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती. त्यानंतर ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. गेल्या मोसमात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सातत्याने यश मिळविले होते. त्यावेळीही महासंघाने तिच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, त्यावेळी तिच्या नावाचा विचार झाला नव्हता.
यंदा पुन्हा एकदा तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यावेळी भारतीय महिला हॉकीपटू राणी रामपाल व मनिका बात्रा यांच्यापैकी कोणाला हा पुरस्कार मिळणार याबाबत उत्सुकता आहे. तसे पाहिले तर मनिका लहानपणापासून या खेळात सातत्याने प्रगती करत आहे व जागतिक स्तरावर आपला दबदबा करण्यात यशस्वी ठरलेली ती एकमेव भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे.
चीन, कोरिया, तैवान, इंडोनेशिया, जपान यांच्या मक्तेदारीला शह देण्याची कामगिरी गेल्या तीन मोसमांपासून मनिका करताना दिसत आहे.
पुरस्कारासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाकडून सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्णपदक पटकवणारी ती भारताची पहिली महिला टेबल टेनिसपटू होती. गेल्या वर्षी तिला खेलरत्न पुरस्कार घोषित झाला नव्हता.
सरावाबाबत संभ्रम…..
मनिका जरी सराव केंद्राबाबत आनंदी असली तरी अचंथा शरथ कमालसह अनेक अन्य खेळाडू संभ्रमात आहेत. महासंघाने सरावाला परवानगी दिली तरी सध्या सीमाबंदीमुळे विविध शहरांत राहात असलेल्या खेळाडूंना सरावात सहभागी होता येणार का, हाच खरा प्रश्न आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने विलगीकरणाचे निर्बंध असल्याने कोणी खेळाडू धोका पत्करून सराव सत्रात सहभागी होईल याची खात्री नाही.