कलंदर: जाहीरनामे, वचननामे…

उत्तम पिंगळे

विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक. फक्‍त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडांवर पळून जाईल.

वेताळ म्हणाला, आता महाराष्ट्र देशी निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपण सत्तेवर आल्यास काय काय बदल घडवून आणू यांची सर्वांनी यादीच जाहीर केली आहे. आता काही पक्षांची युती आहे, काही पक्षांची आघाडी आहे व अनेक छोट्या पक्षांच्या आघाड्या व स्वतंत्रपणे लढवणारेही आपापल्या परीने राज्य, जिल्हा वा अगदी तालुका स्तरांवरही विविध आश्‍वासने देत आहेत. आता वानगी दाखल मी तुला सांगतो. एकाने अत्यल्प दरात पोटभर जेवण व पर्यावरण रक्षणाची हमी दिलेली आहे तर दुसऱ्यांनी पेट्रोल डिझेल दर कपात करू व ठिबक सिंचनासाठी भरघोस सूट देऊ असे आश्‍वासन दिले आहे, काहींनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे, तर काहींनी नागरी बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण सरकारकडून मोफत देण्याचीही घोषणा केली आहे.

काहींनी वाहन कायद्यातील दंडाची तरतूद खूप कमी करू, असेही आश्‍वासन दिलेले आहे. म्हणजे विक्रमा, महाराष्ट्रात तरी सुगीचे वा अच्छे दिन येतील असे गुलाबी चित्र दिसत आहे व असे प्रत्यक्ष झाले तर महाराष्ट्र राज्य अव्वल होईल की नाही? काय विक्रमा मी म्हणतोय ते खरे आहे की नाही?

विक्रम म्हणाला, हे वेताळा मुळातच अशी भरघोस आश्‍वासने द्यायची वेळ येत आहे हेच मागील सर्वच सरकारचे अपयश आहे. आता तू सांगितलेल्या आश्‍वासनांचा एक एक मुद्दा पाहू. नाममात्र व अत्यल्प दरात भरपेट जेवण मग अगोदरची झुणका भाकर गेली कुठे? पर्यावरणावर एवढे प्रेम आहे मग आरे, लवासा, नाणार काय आहे नक्‍की? पेट्रोल, डिझेल दर कमी करणे कोणाच्या हातात नाही; पण राज्य त्यावरील व्हॅट कमी करू शकतो मग जीएसटी आल्यावर ते का नाही कमी केले? ठिबक सिंचनासारख्याला भरघोस सूट देण्याकरता निवडणुकांचा मुहूर्त कशाला? ते आधीही देता आले असते.

बेरोजगार भत्ता देऊ, पण मग बेरोजगार निर्माणच झाले कसे? इथे उद्योग का येत नाहीत? स्थानिकांना रोजगार देऊ म्हणता, पण प्रचंड रोजगार निर्माण झाला तर हा प्रश्‍न येणारच नाही? शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ म्हणजे त्यात मोठे व सधन शेतकरीही आले. मोफत शिक्षण देऊ मग आधीच शुल्क का आकारले? मोटार वाहन दंड कमी करू पण जर तुम्ही नियम मोडत नसाल तर दंड जास्त असला तरी त्यांनी काय फरक पडणार आहे? म्हणूनच वेताळा सर्वांचे जाहीरनामे, वचननामे त्याच्या सरकारांच्या पूर्वीच्या चुकाच दर्शवत आहेत.

मोफत काहीही देण्याकरता नेत्यांना त्यांच्या खिशातून थोडेच काही द्यायचे आहे? तेच नियम बनवणार व स्वतःसाठी सुखसोयी घेणार. हे सर्व निवडणुकीचे राजकारण आहे ते अर्थशास्त्रविरुद्ध जाऊ शकते जेणेकरून सवंग लोकप्रियता मिळवता येते. एक लक्षात ठेव वेताळा, की कोणतीही गोष्ट फुकट मिळत नसते. कुणीतरी त्याचे शुल्क चुकते करत असते पण निवडणूक आली की मग आश्‍वासन द्यायला काय जाते?
विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस तेच खरे सत्य आहे हे मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो असे म्हणून वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.