बेल्हे -मंगरूळ (ता. जुन्नर) झापवाडी शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी तब्बल चार तासांच्या परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. त्याला माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पात हलविण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी येळे यांनी सांगितले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगरूळ (ता. जुन्नर) नजीक झापवाडी शिवारात बाबाजी हरिभाऊ नढे यांच्या शेतातील विहिरीत दोन वर्षे वयाचा बिबट्या पडल्याचे सकाळी अकराच्या सुमारास ते इलक्ट्रिक मोटार सुरू करण्यास गेले असता विहिरीतून आवाज आल्याने बिबट्या विहिरीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर किरण गोरे यांनी ही माहिती वनविभागाला दिली. माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पाच्या रेस्क्यु आपरेशन टीमचे डॉ. अजय देशमुख आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन विहिरीत पिंजरा सोडला.
विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात बसल्यानंतर पिंजरा वर घेण्यात आला. बिबट्यानेही इतरत्र कोठेही न जाता पिंजऱ्यात झेप घेतली. त्यानंतर त्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले. दरम्यान सावजाचा पाठलाग करत असताना दोन बिबटे विहिरीत पडला असावेत, असा अंदाज वनपाल दत्ता फापाळे, वनविभागाच्या के. एस. नायकोडी, बी. एस. शेळके, जिजाभाऊ भडलकर, आनंदा गुंजाळ या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. परिसरात याच बिबट्याने दोन दिवसांपूर्वी वासरू आणि दोन शेळ्या ठार केल्या होत्या, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.