Mango Market – एकीकडे कर्नाटक हापूसचा हंगाम बहरला असून आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत आंब्याला बाजारात उठाव नाही. त्यामुळे भावात १५ दिवसांच्या तुलनेत २५ टक्केंनी घट झाली आहे. मार्केट यार्डासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये कोकणातील हापूस उपलब्ध आहे. तुलनेने भावही कमी आहेत. त्यामुळे कर्नाटकऐवजी रत्नागिरी हापूस खरेदी करण्यास नागरिक पसंती देत आहेत. यंदा हवामान बदलाचा फटका कर्नाटक हापूसला बसला. नेहमीच्या तुलनेत २० दिवसांनी विलंबाने हंगाम सुरू होऊन तो आता बहरला आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात १५ दिवसांपूर्वी दररोज ५ हजार पेटी आवक होत होती. आता दररोज १० ते १५ हजार पेटी आवक होत आहे. आवकेच्या तुलनेत मागणी नसल्याने भाव घटले आहे. कर्नाटक हापूसच्या कच्च्या मालाच्या ४ ते ५ डझनाच्या पेटीला ८०० ते १००० रुपये भाव आहे. कोकणातून दररोज ८ ते १० हजार पेटींची आवक होत आहे. ४ ते ७ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला दर्जानुसार १००० ते २५०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती युवराज काची यांनी दिली. “कर्नाटक आणि कोकणातील हापूसची एकाचवेळी आवक वाढली आहे. त्यामुळे दोन्हींचे भाव घटले आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने येत्या ८ ते १० दिवसात कोकणातील आवक घटणार आहे. त्यावेळी कर्नाटक हापूसला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत भाव स्थिर राहतील.” – रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी, मार्केटयार्ड “हवामान बदलामुळे यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम विलंबाने सुरू झाला आहे. त्यामुळे आंब्याला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, मागणी नसल्यामुळे भाव कमी आहे. उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च निघणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.” – सय्यद उस्मान खतायी, उत्पादक टुमकूर जिल्हा, कर्नाटक