आंबी ग्रामपंचायतीवर गैरव्यवहाराचे ढग!

घोटाळेबाजांवर कारवाई अटळ : आचारसंहितेनंतर दप्तर तपासणीचा “निकाल’

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार – घोजगे

मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आणि विस्ताराधिकारी महादेव कांबळे या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदार घोजगे यांच्याकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तक्रारदार घोजगे मावळ पंचायत समितीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. या दोषींवर कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचाराला मावळ पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी खतपाणी घालत असल्याचे बोलले जात आहे. रामनाथ घोजगे म्हणाले की, माझी लढाई सुरूच राहणार आहे. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.

वडगाव मावळ – आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या 2013 ते 2018 या सहा वर्षांतील भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे. सामाजिक कार्यकर्ते रामनाथ शंकर घोजगे यांच्या पाठपुराव्याला यश आले. मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व विस्ताराधिकारी महादेव कांबळे यांनी 6 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयाची दप्तर तपासणी केली. मात्र, तपासणीला दोन महिने उलटले तरीही या प्रकरणाचा निकाल लागला नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला मावळ पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारीच बळ देत असल्याचा आरोप घोजगे यांनी केला आहे.

दोषी असल्याचे निर्दशनास – वाजे

आंबी ग्रामपंचायतीमधील गैरव्यव्हाराबाबत प्रशासनाकडून मावळ पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे यांनी अधिकृत प्रतिक्रिया नोंदविली आहे. वाजे म्हणाले की, आंबी ग्रामपंचायतीच्या प्रकरणातील दप्तर तपासणी झाली आहे. त्या दोषी असल्याचे निर्दशनात आले आहे. आचारसंहिता संपल्यावर निकाल जाहीर करण्यात येईल.

दप्तर तपासणीस दोष उघड झाला असून, आचारसंहिता संपल्यानंतर निकाल दिला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत आंबी हद्दीत वारंगवाडी, राजपुरी, गोळेवाडी आदी गावांचा समावेश होतो. या औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत असल्याने शैक्षणिक संस्थांचा नावारूपाला आल्या आहेत. वार्षिक उलाढाल सुमारे 42 लाख रुपयांची आहे. सन 2012 ते 2018 दरम्यान ग्रामसभेचा ठराव न घेता बेकायदेशीर बेरर धनादेश काढणे, ग्रामपंचायत दप्तरात खाडाखोड करून घरपट्टी वसुली जमा झालेली नोंद नसून, रक्‍कम बॅंकेत जमा होत नाही, 15 टक्‍के निधीचा गैरवापर केला जात असून, कोणत्याही कामाचा संबंध नाही, ठेकेदार नसताना त्या व्यक्तींना धनादेश दिले गेलेत. याशिवाय माजी उपसरपंच व सदस्य यांच्या नावे बेरर धनादेश वटविण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीच्या निधीशी तत्कालीन सरपंच अलका जाधव यांच्या नावे तसेच नितीन कोंडिबा मापारी यांचा काही संबंध नसताना त्यांच्या नावेही धनादेश काढले असल्याचे घोजगे यांची तक्रार आहे. या संदर्भात 6 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयात दप्तर तपासणी करण्यात आली. तक्रारदार घोजगे यांचा लेखी जवाब नोंदविला तसेच या प्रकारात ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांची मिलीभगत असल्याचा दावा घोजगे यांनी केला आहे. या प्रत्यक्ष दप्तर तपासणी व जवाब नोंदवून दोन महिने झाले आहेत. मात्र त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचेही तक्रारदार घोजगे यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.