सोने व दीड लाख रुपयांसाठीच मंगला जेधे यांचा खून

सातारा  – संतोष पोळने माझ्यासमोर मंगला जेधे यांचा इंजेक्‍शन देऊन खून केला. त्यानंतर विकृत आनंद व्यक्त करून त्याने त्यांच्याकडील दीड लाख रुपयांची रोकड व अंगावरील सोने लुटले, अशी साक्ष वाई-धोम खूनसत्रातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने सातारा जिल्हा न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दिली. पोळच्या सांगण्यावरून मीच मंगला जेथे यांना त्याच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वाई-धोम खूनसत्र खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ज्योती मांढरे हिची सरतपासणी घेतली. मंगला जेधे यांचा खून करण्यासाठी पोळने वापरलेली इंजेक्‍शनची सिरिंज, विषारी औषधाची बाटली, मंगला जेधे यांची बॅग आदी वस्तू ज्योतीने ओळखल्या.

ज्योती म्हणाली, मंगला यांचा खून करण्याचा प्लॅन दि. 16 जून 2016 रोजी संतोषने मला सांगितला होता. सोने दुप्पट करून देतो, असे आमिष त्याने मंगला यांना दिले होते. मंगला यांना मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जायचे असल्याने त्यांनी सर्व सोने व दीड लाख रुपये बरोबर घेतले होते. पोळच्या सांगण्यावरून मी दि. 16 रोजी पहाटे मंगला यांना माझ्या दुचाकीवरून पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणले होते. पुढे लांबचा प्रवास करायचा असल्याने थकवा येऊ नये म्हणून इंजेक्‍शन देतो, असे सांगून पोळने विषारी इंजेक्‍शन जेधेंना दिले.

त्या तडफडू लागल्यावर मी व पोळने त्यांचे हातपाय पकडून धरले. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर पोळने “अब मर गयी साली’, असे म्हणत त्यांच्या अंगावरील सोने व बॅगमधील दीड लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर मंगला या जिवंत आहेत आणि त्या पोळकडील सोने लुटून गायब झाल्याचे भासवण्यासाठी पोळनेच त्यांचा मोबाइल माझ्याकडे देऊन पुण्याला जायला सांगितले. पुण्यात गेल्यानंतर मंगला यांचा मोबाइल फोन सुरू करून कोणाचा फोन आला तर तो घ्यायचा,

पण काहीही बोलायचे नाही, असेही पोळने सांगितले होते. त्यानुसार मी पुण्यात गेल्यानंतर मंगला यांचा फोन सुरू केला. त्यावर कॉल आल्यावर पोळने सांगितल्याप्रमाणे तो घेतला, पण एक शब्दही उच्चारला नाही. त्यानंतर पोळचाही कॉल आला.

“मॅडम तुम्ही माझे सगळे काही घेऊन गेला आहात, प्लीज माझ्याशी बोला’ असे तो म्हणाला. त्यानंतर पोळने दुपारी तीन वाजता मला फोन करून वाईला बोलवून घेतले. त्यानंतर दि. 30 जून 2016 रोजी पोळच्या सांगण्यावरूनच मी माझ्या वडिलांना घेऊन कोल्हापूरला गेले. तेथे पोळने दिलेली चिठ्ठी वडिलांना वाचायला दिली. “तुझे पोलीस थाने मे जाने की इतनी क्‍या जल्दी थी’, असे चिठ्ठीत लिहिले होते. त्यानंतर पोळचा फोन आल्यावर माझ्या वडिलांनी चिठ्ठीवरील मजकूर फोनवर वाचून दाखवला. तो कॉल रेर्कार्ड करून पोळने मंगला जेधे यांचे अपहरण झाल्याचा बनाव केला. आता या खटल्याची पुढील सुनावणी दि. 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here