उपकेंद्र सहा महिन्यांपासून बंद; नागरिकांचे हाल
लसीकरणादिवशीच उघडते उपकेंद्र
मंद्रुळकोळे उपकेंद्र ज्या दिवशी लसीकरण असते. त्याच दिवशी दिवसभर उघडे असते. इतर दिवशी ते बंद असते. त्यामुळे हे उपकेंद्र केवळ शोफपीस बनले आहे. याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून योग्य माहिती मिळू शकत नाही. या ठिकाणच्या उपकेंद्रात किरकोळ आजारावरील औषधे मिळत होती. तसेच या परिसरातील गरोदर महिलांसाठी डिलेव्हारीसाठी खोली बांधली आहे. मात्र आजपर्यंत या ठिकाणी गरोदर महिलेची नीट तपासणीही झालेली नाही.
ढेबेवाडी – सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथील उपकेंद्र गेली सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथील लोकांना हे उपकेंद्र
असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी मंद्रुळकोळे खुर्द या परिसरातील लोकांच्या मागणीवरून प्राथमिक उपकेंद्र बांधण्यात आले. या उपकेंद्रामुळे येथील आरोग्याचा प्रश्न मिटला होता. या ठिकाणी आरोग्य सेविका राहत होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या ठिकाणाहून औषध मिळत होते. मात्र सध्या हे उपकेंद्र बंद असल्याने लोकांना ढेबेवाडी येथे 3 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे.
या उपकेंद्राशेजारी दहा वाड्यावस्त्या आहेत. शिवाय येथे प्राथमिक शाळा आहे. मात्र सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन उपकेंद्राची पहाणीही केलेली नाही. या ठिकाणच्या उपकेंद्राची जबाबदारी असलेले वैद्यकीय अधिकारीच जाणिवपूर्वक इकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांच्यात संतापाची लाट पसरली आहे.
या ठिकाणी उपकेंद्र व्हावे, म्हणून येथील लोकांनी लोकवर्गणी जमा करून त्या ठिकाणची जागा विकत घेतली. येथे भव्य उपकेंद्र उभे राहिले. शासनाने त्यासाठी लाखो रूपये खर्च केले. पण त्यांचे येथील अधिकाऱ्यांना देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. परिणामी या भागातील रुग्णांचे आतोनात हाल होवू लागले आहे. यासाठी वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी विभागातील जनतेतून होत आहे.
मंदुळकोळे खुर्द येथे प्राथमिक उपकेंद्र व्हावे, यासाठी हिंदुराव पाटील यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी हे उपकेंद्र येथे उपलब्ध करून दिले. मात्र येथील लोकांना योग्य सुविधा मिळत नसतील तर या उपकेंद्राचा उपयोग काय? तेव्हा संबंधित विभागाने याची गांभिर्याने दखल घेवून या ठिकाणचे उपकेंद्र सुरळीत चालू करून वैद्यकीय अधिकाऱ्याने आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी थांबून लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात.
संजय लोहार, माजी उपसरपंच, मंदुळकोळे खुर्द