Mandira Bedi: मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी मंदिरा बेदी आज एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. तिचा प्रवास सोपा नव्हता, पण प्रत्येक अडचणीला सामोरं जात तिने यश मिळवलं. अनेक टीका, वाद आणि वैयक्तिक संकटांचा सामना करूनही तिने कधी हार मानली नाही. मंदिरा बेदीचा जन्म १५ एप्रिल १९७२ रोजी कोलकाता येथे झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं. ९०च्या दशकातील लोकप्रिय ‘शांती’ या मालिकेमुळे तिला मोठी ओळख मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली आत्मनिर्भर स्त्री प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आणि ती घराघरात प्रसिद्ध झाली. Mandira Bedi टीव्हीनंतर तिने चित्रपट आणि होस्टिंगमध्येही काम केलं, पण तिच्या करिअरला खरं वळण मिळालं ते २००३ साली. त्या वेळी तिने आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या स्पर्धेदरम्यान अँकरिंग सुरू केली. त्या काळात क्रिकेटसारख्या क्षेत्रात महिला अँकर पाहणं हे नवीन होतं. मंदिरा बेदीने हे आव्हान स्वीकारलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही अँकरिंग केली. Mandira Bedi Mandira Bedi मात्र, या प्रवासात तिला अनेक टीका आणि वादांचा सामना करावा लागला. २००३ विश्वचषकादरम्यान तिच्या कपड्यांवरून टीका झाली. २००७ साली तिने परिधान केलेल्या साडीवर विविध देशांचे झेंडे असल्यामुळे वाद निर्माण झाला आणि तिला सार्वजनिकरित्या माफी मागावी लागली. तरीही तिने या सगळ्याचा धैर्याने सामना केला. वैयक्तिक आयुष्यातही मंदिरा बेदीने कठीण प्रसंग पाहिले. तिने दिग्दर्शक राज कौशल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, २०२१ साली त्यांच्या निधनाने ती खूप हादरली. या दुःखद प्रसंगानंतरही तिने स्वतःला सावरलं आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आज मंदिरा बेदी फक्त अभिनेत्री किंवा अँकर नाही, तर एक मजबूत आणि आत्मविश्वासू स्त्री म्हणून ओळखली जाते. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिने दाखवून दिलं की, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं.