मनदीपची हॅट्ट्रिक, भारत अंतिम फेरीत

टोकियो – मनदीपसिंगने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने जपानचा 6-3 असा पराभव केला आणि ऑलिंपिक टेस्ट इव्हेन्टमधील पुरूषांच्या हॉकीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंडच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे.

भारतास साखळी गटातील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 2-1 असे पराभूत केले होते. मात्र या पराभवापासून बोध घेत भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने जपानविरूद्ध खेळ केला. मनदीपने 9 व्या, 29 व्या व 30 व्या मिनिटाला गोल केला. नीलकांता शर्मा (3 रे मिनिट), नीलम संजीव झेस (7 वे मिनिट) व गुर्जंटसिंग (41 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. जपानच्या केन्तारो फुकुदा (25 वे मिनिट), केन्ता तानाका (36 वे मिनिट) व काझुमा मुराटा (52 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

हा सामना सुरूवातीपासून आक्रमक चालींमुळे रंगतदार झाला. तिसऱ्या मिनिटाला नीलकांताने जोरदार चाल करीत भारताचे खाते उघडले. पाठोपाठ गुर्जंटसिंगने केलेली चाल जपानच्या बचावरक्षकांनी असफल ठरविली. मात्र सातव्या मिनिटाला भारतास पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत नीलम संजीवने अचूक फटका मारला आणि संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोनच मिनिटांनी मनदीपने स्वत:चा पहिला गोल करीत भारताची आघाडी 3-0 अशी वाढविली. त्याचे सहकारी जर्मानप्रितसिंग व कर्णधार हरमानप्रितसिंग यांनी केलेली आक्रमणे जपानच्या खेळाडूंनी परतविली. 25 व्या मिनिटाला त्यांच्या फुकुदाने गोल करीत भारताची आघाडी कमी केली. मात्र त्याचा हा आनंद फार वेळ टिकला नाही.

मनदीपने लागोपाठ दोन गोल करीत संघास 5-1 अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी त्यांनी पूर्वार्धात राखली.
सामन्याच्या तिसऱ्या डावात जपानच्या खेळाडूंनी पूर्ण ताकदीनिशी खेळ केला. त्यांच्या दोन तीन चाली भारताचा गोलरक्षक कृष्णन पाठकने अडविल्या. मात्र तानाकाने 36 व्या मिनिटाला मारलेला फटका त्याला रोखता आला नाही. त्यानंतर पाच मिनिटांनी गुर्जंटसिंगने अचूक नेम साधला आणि भारतास 6-2 असे अधिक्‍य मिळवून दिले.

जपानच्या मुराटाने 52 व्या मिनिटाला गोल करीत ही आघाडी कमी केली. त्यानंतर मात्र भारताच्या बचावरक्षकांनी त्यांच्या चाली थोपवून ठेवण्यात यश मिळविले. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना दोन्ही संघांना प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा फायदा घेण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)