“काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमला

मांढरदेव येथील यात्रेला उत्साहात प्रारंभ; हजारो भाविकांची उपस्थिती, जिल्हा प्रशासन दक्ष

मांढरदेव – महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव, ता. वाई येथील श्री काळूबाईच्या दर्शनाला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आज लाखो भाविकांनी हजेरी लावली. “काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमून गेला होता. येथील यात्रेस भक्‍तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

शाकंभरी पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस असल्याने आज सकाळी 6 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक राजेंद्र सावंत यांच्या हस्ते देवीची आरती व महापूजा झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दिनेश शेट्टी, वाईचे न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर, डी. आर. माळी, वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसीलदार रणजित भोसले, त्यांच्या पत्नी पोलीस निरीक्षक सौ. देवीश्री मोहिते-भोसले, जिल्हा सरकारी वकील तथा विश्‍वस्त महेश कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक, सीए, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, सुधाकर क्षीरसागर, शैलेंद्र क्षीरसागर, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे, आपत्ती व्यवस्थापनाचे देविदास ताम्हाणे, सरपंच सौ. अनिता मांढरे, उपसरपंच शंकर मांढरे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीपाद यादव, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे, शाखा अभियंता अजयसिंग यादव, शाखा उपअभियंता सचिन मोरे, योगेश कराडे, राजेंद्र रासकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाकंभरी पौर्णिमा आज असल्याने काल रात्रीपासूनच भाविक मांढरदेव येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. रात्री देवीचा जागर झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. देवस्थान ट्रस्टने कळस दर्शन, देव्हारा व चरण दर्शन रांगा अशा वेगवेगळ्या रांगांसाठी बॅरिकेड्‌स लावल्याने भाविकांना देवीचे दर्शन सुलभरित्या घेता आले.

आज सकाळी 6 वाजता देवीच्या पायरीजवळील दर्शन रांगेतील प्रथम भाविक लक्ष्मण व सौ. हर्षदा पोतदार (रा. भांडुप, मुंबई) या दाम्पत्याला देवीच्या पूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेली सोळा वर्षे देवीच्या दर्शनासाठी येत आहे. या दाम्पत्याचा मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते देवस्थानच्यावतीने साडी-चोळी व देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.

मांढरदेव येथे प्रचंड धुके व थंडी असल्याने सकाळी गर्दीचा ओघ कमी होता. मात्र, दुपारी बारानंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली. दुपारी एकनंतर गर्दीचा ओघ वाढला. मंदिर परिसरात काही वेळ प्रचंड गर्दी होती; परंतु दर्शनासाठी जाण्याचा व मागे येण्याचा मार्ग वेगवेगळा असल्याने रांगेतील भाविकाला साधारणत: दोन तासांमध्ये दर्शन होत होते. देव्हारा दर्शन व कळस दर्शन या रांगांमधील भाविकांची संख्याही मोठी होती.

देवीचे दर्शन झाल्याने सुखावलेल्या भाविकांना रांगेतून बाहेर आल्यावर देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात येत होते. दर्शन घेऊन परतणारा भाविक उतरणीच्या मार्गावर थाटलेल्या दुकानांमध्ये देवीचे फोटो, बांगड्या, प्रसाद म्हणून पेढे, मुखवटे व इतर वस्तू खरेदी करण्यात दंग होते. मांढरदेव परिसरात अनेक भाविक वाहने लावून देवीसाठी गोड नैवेद्य करताना दिसत होते.

मुंबई येथील भाविक कालेकर यांनी देवीच्या मंदिराला फुलांची सजावट केली होती. केतकावळे येथील बालाजी ट्रस्टच्यावतीने प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या मोफत नाश्‍त्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आळंदी येथील “स्व काम’ सेवा मंडळचे स्वयंसेवक मंदिर परिसराची स्वच्छता करत होते. यात्रा सुरळीत व शांततेत होण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा मांढरदेव येथे तैनात करण्यात आला होता. यामध्ये पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, 12 पोलीस उपनिरीक्षक, 200 पुरुष व 25 महिला कर्मचारी, 60 होमगार्डस्‌, वाहतूक शाखेचे 20 कर्मचारी यांचा समावेश होता. अनिरुद्धबापू डिझास्टर मॅनेजमेंटचे 240, महाराष्ट्र कमांडो फोर्सचे 50 व “मन मे है विश्‍वास’ कमांडो फोर्सचे 50 स्वयंसेवक स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित होते.

यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय विभागाची पथके काळूबाई मंदिर, ग्रामपंचायत व उतरणीच्या मार्गावर कार्यरत आहेत. पाणीपुरवठा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी मांढरदेव येथे तळ ठोकून आहेत. अग्निशमन दलाचे टॅंकर, क्रेन, रुग्णवाहिकादेखील मंदिर परिसरात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पशुहत्या रोखण्यासाठी वाहनांची तपासणी
काळूबाई यात्रेत पशुहत्या, वाद्य वाजवणे, झाडांना लिंबे, काळ्या बाहुल्या, चिठ्ठ्या ठोकणे, करणी करणे, मद्य विक्री यावर बंदी आहे. यात्रेत पशुहत्या होऊ नये म्हणून पोलीस व प्रशासन दक्ष आहे. त्यासाठी वाई-मांढरदेव व भोर-मांढरदेव या रस्त्यांवर जागोजागी वाहनांची तपासणी केली जात आहे.

======================

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.