#व्हिडीओ :चिमुकल्यांनी भरवली मंडई

पुणे :  वर्गात गोंधळ, बडबड करून, प्रश्‍न विचारून कायमच शिक्षकांच्या डोक्‍याची अक्षरश: मंडई करणाऱ्या बालचमूंनी गुरूवारी प्रत्यक्षात “मंडई’ भरवून “भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी’ अशी आरोळी ठोकली. मा. स. गोळवलकर गुरूजी पूर्वप्राथमिक विद्यालया तर्फे “बंटी-बबली भाजी मंडई’ असा अनोखा उपक्रम करण्यात आला.

संक्रांत आणि भोगी या काळात मंडई हिरवीगार करणाऱ्या नव्या भाज्यांच्या निमित्ताने तसेच मुलांना व्यावहारिक गोष्टींचे प्राथमिक ज्ञान व्हावे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाला समितीचे अध्यक्ष मिलींद कांबळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका खेडकर, पर्यवेक्षक विकास दिग्रसकर, पालक उपस्थित होते.

पालक, मेथी, चुका, कांद्याची पात, आळू, कोथींबीर, पुदीना, टोमॅटो, काकडी, कांदा, आले, लसूण, फ्लॉवर, कोबी, दुधी आणि लाल भोपळा, पावटा, बीन्स, भेंडी, मुळा, मोड आलेले मूग-मटकी, गाजर, वाटाणा, बटाटा या भाज्या आणि फळभाज्यांनी ही बालचमूंची मंडई फुलून गेली. उपस्थित पालकांनी मुलांकडून भाजी खरेदी केली. अक्षरश: दहा ते पंधरा मिनिटातच मिनिटातच भाजी संपल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भाजी विकण्यात यशस्वी झाल्याचा आनंद पहायला मिळाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here