“माणदेशी’ची छावणी सुरूच राहणार

तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

सध्या या माणदेशी फाउंडेशनच्या सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीतील आजपर्यंत 1200 ते 1300 जनावरे शासनाने सुरू केलेल्या त्या त्या भागातील चारा छावणी त गेली असून आता या छावणीत 8454 जनावरे राहिली असून यातील आणखी काही जनावरे जाणार असल्याची माहिती फाउंडेशनने दिली आहे.

म्हसवड – माणदेशी फाउंडेशनची सुरू असलेली जनावरांची चारा छावणी ही सुरूच राहणार असून शासनाने मदत देऊ अगर न देऊ परंतु ही छावणी फक्त माण तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सुरू ठेवली जाणार असल्याचा दिलासा छावणी चालक विजय सिन्हा यांनी शेतकऱ्यांना दिला असून पर जिल्ह्यातील तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या तालुक्‍यात शासनाने सुरू केलेल्या छावण्यांचा पर्याय उपलब्ध झाला असून त्यांनी त्यांचा पर्याय निवडावा असे ते म्हणाले.

जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या म्हसवड येथील माणदेशी फाउंडशनने चालवलेली चारा छावणी पाणी उपलब्ध होत नसल्याने बंद होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे छावणी माणदेशी फाउंडेशनने चारा छावणी बंद करणार अशा आशयाच्या बातम्या विविध दैनिकातून छापून आल्या होत्या. त्यामुळे या छावणीवर गेल्या चार महिन्यापासून नऊ ते दहा हजार जनावरे असलेल्या शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली होती. कारण पोटच्या पोराप्रमाणे संभाळलेली जनावरे कसायाच्या हवाली करण्याची वेळ आली होती. मात्र भयंकर दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने गेल्या चार महिन्यापासून बजाज फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात एकमेव चारा छावणी सुरू केली आहे.
या छावणीवर नऊ ते दहा हजार माण तालुक्‍यासह परजिल्ह्यातील व परतालुक्‍यातील जनावरे या चारा छावणीत आहेत. या जनावरांबरोबर शेतकरीही या छावणीमध्ये मुक्कामी आहेत.

या छावणीवर जनावरांना मुबलक चारा पाणी दिला जात असून या जनावरांसोबत असलेल्या शेतकऱ्यांना उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी नेट, रात्री उजेडासाठी एलईडी लाईटसारख्या गरजाही माणदेशी फाउंडेशनने दिल्या होत्या. मात्र सध्या उन्हाचा कहर सुरू असून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच बजाज फाउंडेशनचाही करार संपला असून छावणी बंद करावी लागणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे छावणीवरील शेतकरी चिंतेत पडला होता.

या पार्श्‍वभूमीवर माणदेशी फाउंडेशनचे विजय सिन्हा यांनी नुकतीच मेघासिटी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी करण सिन्हा उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय सिन्हा म्हणाले, गेल्या चार महिन्यापासून ही छावणी सुरू आहे या छावणीतील जनावरांना सध्या पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे छावणी बंद करण्याची आमची मानसिकता झाली होती. या आशयाच्या बातम्या प्रसिध्द झाल्यामुळे शासनानेही याची दखल घेतली असून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील व मंत्री सदाभाऊ खोत यांचे छावणी संदर्भात चेतना सिन्हा यांच्याशी चर्चा झाली असून छावणी बंद करू नये, छावणीतील जनावरांना प्रशासनाकडून पाणी पुरवठा करण्याचे अश्‍वासन दिले आहे. परंतु सध्या पाण्याची उपलब्धताच नसल्याने आमचाही नाईलाज झाला असून परजिल्ह्यातील परतालुक्‍यातील शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या तालुक्‍यात शासनाने चारा छावणीचा पर्याय उपलब्ध करून दिला असून त्या संबंधित शेतकऱ्यांनी तो पर्याय निवडावा असेही सिन्हा म्हणाले.

कारण फाउंडेशनची ही छावणी अगदी डिसेंबरपर्यंत चालवायची तयारी आहे. त्यातच या भागात पडणारा मोसमी पाऊस हा सप्टेंबर नंतरच पडतो. त्यामुळे अजून चार ते पाच महिने तर पाण्याची टंचाई ही जाणवणारच आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लाख मोलाचे असणारे पशुधन वाचने गरजेचे असल्यामुळे शासनाने मदत देऊ अगर न देऊ आम्ही ही छावणी सुरू ठेवणार असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये असा दिलासा सिन्हा यांनी छावणी तील शेतकऱ्यांना दिला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.