मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले (वय 25) याची एकलहरे येथे गोळ्या झाडून हत्या केल्याच्या गुन्ह्यातील नऊ आरोपींपैकी सात जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना शनिवार (दि. 7) पर्यंत घोडेगाव न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत मंचर पोलीस ठाण्यात ओंकार बाणखेले यांचा भाऊ मयूर बाणखेले याने सोमवारी (दि. 2) दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेतन सत्यवान गायकवाड (वय 19, रा. आनंदवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), राम सुरेश जाधव (वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड), सौरभ कैलास पोखरकर (वय 19, रा. मंचर), आकाश संतोष खैरे (वय 20, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर), लुट्या ऊर्फ तुषार नितीन मोरडे (रा. मंचर) यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संतोष सुनील जाधव (रा. पोखरी), पवन सुधीर थोरात (रा. मंचर) हे दोन आरोपी फरार आहेत.
संतोष जाधव याने त्याच्या सोशल मीडियावर सूर्य उगवायचे आत तुला संपवतो असे स्टेटस ठेवल्यामुळे ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार, कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन अज्ञात इसमांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपुर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्यावर रविवारी (दि. 1) भरदुपारी गोळीबार करुन हत्या केली आहे.