क्षुल्लक कारणासाठी भाडेकरुनेच घेतला घरमालकाचा जीव
वाई – मेणवली (ता. वाई) येथील दिलीप कृष्णा शिखरे (वय 52) यांच्या खून प्रकरणाचा वाई पोलिसांनी छडा लावत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, क्षुल्लक कारणासाठी भाडेकरुनेच शिखरे यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. शफीक शेख असे खून करणाऱ्या भाडेकरुचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, दिलीप शिखरे आणि भाडेकरु शफिक अल्लाउद्दीन शेख यांच्यात सोमवारी किरकोळ वादावादी झाली होती. त्यातूनच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शफिक शेख याने शिखरे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केला. या घटनेनंतर मेणवलीसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शिखरे यांच्या खुनाची बातमी पोलीस पाटील संदेश वैराट यांनी वाई पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. यावेळी घटनास्थळावरुन दोन दुचाकीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या.
अधिक तपास करत असताना श्वान घराभोवतीच फिरत राहिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करुन शिखरे यांचे भाडेकरु शफिक शेख याला ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता शेख याने खुनाची कबुली दिली. दरम्यान, शफिक शेख याला अटक करण्यात आली असून शुक्रवारी दि. 15 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक संजय मोतेकर, सहाय्यक फौजदार कृष्णा पवार, हवालदार संतोष शेलार, शिवाजी जाधव, भाऊ धायगुडे, प्रशांत शिंदे, सोमनाथ बल्लाळ, शांताराम बोराडे, हणमंत दडस, ओंकार गरुड या सर्वांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशावरून वाईचे उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करून खुनाला वाचा फोडली.