वटपौर्णिमा आणि मी : मानसी चापेकर

वटपौर्णिमा आणि मी…

कुणा ज्ञात नसतेच पुढच्या क्षणाचे,
कुठे सात जन्मात अडकायचे
ठरवले असे की तुझ्या सोबतीने
मधुर वर्तमानास फुलवायचे

सख्यांनो आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या सर्व मैत्रिणींना खूप शुभेच्छा. लेखाच्या सुरुवातीला ज्या काही माझ्याच चार ओळी मी लिहिल्या आहेत तेच माझं म्हणणंही आहे.

माझी आई, काकू, मावशी, आत्या अगदी माझ्या सासूबाईंनी सुद्धा वटपौर्णिमेची पूजा वर्षानुवर्ष केली. लग्न झाल्यानंतर मी ही पाच सहा वर्ष त्या सांगत आहेत म्हणून किंवा त्यांच्या आनंदासाठी पूजा केली. अर्थात नटून-थटून साडी नेसून पूजा करायला तर मलाही आवडतं. कारण पूजा करताना आपल्या मनातील भाव किंवा आपण देवाजवळ करत असलेली प्रार्थना हे सगळ्यात सुंदर असतं.

तसं तर रोज सकाळी देवाची पूजा केल्यानंतर निरांजनाने उजळून निघणारा देव्हारा, फुलं वाहिलेले स्वच्छ धुतलेले अष्टगंध लावलेले देव हे सगळं सुंदरच दिसतं, नाही का?

परंतु कुठल्याही झाडाची पूजा केल्यानंतर हाच नवरा सात जन्म आपल्याला मिळतो या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही.
हे अगदी मान्य आहे की प्रत्येक सण-समारंभाशी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने भावना निगडीत असतात. माझा इथे कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश मुळीच नाही.ज्या स्त्रिया ही पूजा मनापासून करतात त्यांचं मला कौतुकच आहे

पूर्वीच्या काळी स्त्रिया घरदार, मुलं-बाळं यातच अडकलेल्या असायच्या.त्यांच्या करमणुकीसाठी म्हणून किंवा त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून घराच्या बाहेर पडून चार आनंदाचे क्षण उपभोगावेत या कारणासाठी हे असे सणवार केले गेले असतील असं मला वाटतं.
छानपैकी तयार होऊन, साडी नेसून, दागिने घालून पूजेचं ताट हातात घेऊन,स्वतःला सावरत, पाऊस असला तरीही, वडाच्या झाडावर जाऊन त्याला दोरा गुंडाळून सात जन्म हाच पती लाभावा अशी मनोमन इच्छा मागत वडाची पूजा करणं, हे त्यांच्यासाठी खूप आनंदाचं असायचं आणि अजूनही आहे. त्यानिमित्ताने चार मैत्रिणी गोळा व्हायच्या, इकडच्या-तिकडच्या सुखदुःखाच्या गोष्टी व्हायच्या, त्यातही त्यांना आनंद मिळायचा.

हीच परंपरा जपत पुढेही प्रत्येक पिढीतील स्त्रीने वडाची पूजा केली. काही वर्षांनी वडाची झाडं सगळीकडे उपलब्ध नसल्याने स्त्रियांनी अगदी त्याची फांदी घरात आणून त्याची ही पूजा करणं पसंत केलं. परंतु झाडाची फांदी याचा अर्थ ते झाड नाहीच की! मग अश्या जीव नसलेल्या झाडाची पूजा करून काय फायदा?

अर्थात झाडाची फांदी तोडली जाते, ती बाजारात विकली जाते, आपण ती विकत घेतो याचा अर्थ झाडाला वेदना देत आपण त्याची पूजा करत असतो. निसर्गाचं संगोपन किंवा संवर्धन म्हणून झाडाची पुजा हा सुंदर मुद्दा आहे परंतु त्याच्याशी सात जन्म मिळणारा नवरा ही संकल्पना जोडणं माझ्या मनाला तरी पटत नाही.

आपल्या नवऱ्या साठी जर काही मागणं मागायचंच असेल तर ते आपण देवापाशी नक्कीच मागु. परंतु वर्तमानात त्याच्यासोबत जगत असलेल्या जन्मामध्ये त्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावं, त्याच्या सोबत आपली असलेली साथ कायम शेवटपर्यंत खूप छान उत्तम रित्या पार पाडावी, असं काहीतरी योग्य मागू. मला वाटतं हे जास्त गरजेचं आणि सुंदर आहे.

ज्या सख्यांना पूजा करायला आवडते किंवा सात जन्म हाच नवरा या संकल्पनेवर विश्वासही आहे, त्यांनी ही पूजा नक्कीच करावी मला त्याबद्दल काहीही म्हणायचं नाही. परंतु गेले दोन वर्ष आपण ज्या महामारी च्या संकटातून जात आहोत ते लक्षात घेता घरातच एखाद्या लाकडी पाटावर गंधाचा वड काढून त्याची साग्रसंगीत पूजा करून मनोभावे जे काही आपल्या मनात आहे ते त्याच्याशी आणि देवापाशी मागावं अशी माझी तरी इच्छा आहे.

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी हे प्रत्येक पूजा करणाऱ्या सखीने करायला हवं असं मला मनापासून वाटतं. अर्थात ज्याचा त्याचा विश्वास आणि ज्याच्या त्याच्या भावना ह्याचा मी आदरच करते.नक्कीच हे महामारीचे संकट लवकरात लवकर जाईल आणि जर तुम्ही वडाची पूजा करत असाल तर सगळ्यात आधी ही प्रार्थना करा की या महामारीच्या संकटाचे लवकरात लवकर निवारण होवो आणि मग आपल्या पतीसाठी प्रार्थना करा की हाच पती मला सात जन्म मिळू दे!

– मानसी चापेकर, रोहा, रायगड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.